| पाली/ बेणसे | प्रतिनिधी |
पालीतील बल्लाळेश्वर देवस्थानच्या माघी गणेशोत्सवाला सुरवात झाली आहे. रविवारी 22 ते 26 जानेवारीपर्यंत साजरा होत आहे. यावेळी अधिक भाविक माघी महोत्सवास येतील व यंदा गर्दीचा उच्चांक गाठला जाईल, रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल असे बोलले जात आहे. लाखोंच्या संख्येने आलेल्या नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट सज्ज झाली असून याबाबत नियोजन बैठक पाली तहसील कार्यालयात तालुक्याचे तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. तहसीलदार यांनी सर्व प्रशासकीय अधिकार्यांकडून तसेच बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून नियोजनाची माहिती घेवून मार्गदर्शक सूचना केल्या देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी माघी महोत्सव आनंदात व भव्य दिव्य स्वरूपात विशेषतः कोणतेही गालबोट न लागता साजरा व्हावा यासाठी देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाने सर्व तयारी करून विशेष खबरदारी घेतल्याचे सांगितले.
भाविकांच्या वाहनांची संख्या वाढल्याने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस तसेच देवस्थानचे सुरक्षारक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत. यावेळी पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त ठेवणार असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी दिली. राज्य परिवहन मंडळाकडून गाड्यांची सोय करण्यात आली असून त्याचे आरक्षण पाली बसस्थानक तसेच मंदिर परिसरात देखील एक विशेष सोय केली जाईल अशी माहिती देण्यात आली. माघी महोत्सवाच्या नियोजनाच्या दृष्टीने आयोजीत बैठकीसाठी पाली सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार, नगरपंचायत मुख्याधिकारी विद्या येरुणकर, कर निरीक्षक सोनाली शिंदे, उपसरपंच वैभव आपटे, डॉ. पी. एस. कुंटे, प्रमोद पागवी, व्ही. व्ही. गद्रे, अरुण गद्रे, अमोल साठे आर. एस. थले, डी. डी. म्हात्रे, प्रफुल चांदोरकर,पवन मोर्य, मुरुगन, एस. टी. वाहतूक नियंत्रक विलास तांबट आदी उपस्थित होते.