महिनाभरात 27 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
| कल्याण | प्रतिनिधी |
महावितरणच्या कल्याण परिमंडलात लघुदाब वर्गवारीतील 4 लाख 82 हजार वीज ग्राहकांकडे 98 कोटी रुपयांची चालू थकबाकी आहे. यातील 27 हजार 400 थकबाकीदारांचा वीजपुरवठा ऑक्टोबर महिन्यात खंडित करण्यात आला. सणासुदीच्या दिवसातील संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीदारांनी वीजबिलाचा भरणा करण्याचे तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी आणि रविवारी सुरू ठेवण्यात येणाऱ्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
कल्याण पूर्व आणि पाश्चिम व डोंबिवली विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत 88 हजार 780 ग्राहकांकडे 17 कोटी 70 लाख रुपयांची थकबाकी आहे. आक्टोबरमध्ये आतापर्यंत या मंडलांतर्गत 6 हजार 190 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. उल्हासनगर एक आणि दोन व कल्याण ग्रामीण विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल दोन अंतर्गत 1 लाख 44 हजार 293 ग्राहकांकडे 28 कोटी 18 लाख रुपयांचे वीजबिल थकित असून 7 हजार 946 जणांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. वसई व विरार विभागाचा समावेश असलेल्या वसई मंडलातील 1 लाख 68 हजार 290 ग्राहकांकडे 36 कोटी 43 लाख रुपये थकीत असून 9 हजार 623 जणांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. तर पालघर मंडलातील 80 हजार 951 ग्राहकांकडे 15 कोटी 57 लाख रुपयांचे वीजबिल थकीत असून 3 हजार 662 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
सुट्टीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरु ठेवण्यात आली असून याशिवाय महावितरणचे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल ॲप, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगमार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा उपयोग करून संबंधित ग्राहकांनी थकबाकी व इतर ग्राहकांनी चालू वीजबिलाचा विहित मुदतीत भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.