खालापुरात गुरुवारी महाएल्गार

चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती

| खोपोली | प्रतिनिधी |

खालापूरच्या औद्योगिक पट्ट्यात उद्योगांचे जाळे विस्तारत असताना स्थानिक तरुणांच्या हाताला मात्र रोजगाराची प्रतीक्षा कायम आहे. भूमीपुत्रांच्या रोजगाराचा हा प्रश्न आता आंदोलनाच्या केंद्रस्थानी आला असून, स्थानिक युवकांच्या रोजगारासाठी खालापुरात गुरुवार, दि. 3 सप्टेंबर रोजी महाएल्गाराचे आयोजन करण्यात आले आहे. या लढ्याला शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

तालुक्यातील उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगारात प्राधान्य मिळावे, बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि स्थानिकांच्या रोजगाराचा हक्क अबाधित राहावा, या मागण्यांसाठी हा महाएल्गार होणार आहे. दरम्यान, रोजगाराच्या प्रश्नावर आता तरुणांनी एकत्र येण्याची गरज आहे. आपल्या हक्कासाठी होणाऱ्या या महाएल्गारात बेरोजगार युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन किशोर पाटील यांनी केले आहे. चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या महाएल्गारातून स्थानिक रोजगाराचा प्रश्न प्रशासन आणि उद्योग व्यवस्थापनासमोर ठामपणे मांडला जाणार असल्याने या आंदोलनाकडे तालुक्यातील बेरोजगार युवकांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version