जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी व शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांनी मंगळवारी (दि. 20) मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केले. अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात तर पंचायत समितीच्या 14 जागांसाठी अर्ज दाखल होत असताना कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. यानिमित्ताने महाविकास आघाडी व शेकापचे जोरदार शक्तीप्रदर्शन झाले.
प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून शेतकरी भवन परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली. हातात लाल बावटे घेऊन, “शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो”, “महाविकास आघाडीचा विजय असो” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शेकापचे नेते जयंत पाटील यांची भेट घेतल्यानंतर उमेदवार व कार्यकर्ते उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले.
कावीर जिल्हा परिषद मतदारसंघातून मोहन धुमाळ, कावीर पंचायत समिती मतदारसंघातून अनिल पाटील, रामराज पंचायत समिती मतदारसंघातून अंजली पाटील, थळ जिल्हा परिषद मतदारसंघातून सानिका सुरेश घरत, शहापूर मतदारसंघातून अभिषेक अनिल पाटील, महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाकडून चौल जिल्हा परिषद मतदारसंघातून सुरेंद्र म्हात्रे तसेच आवास जिल्हा परिषद मतदारसंघातून राजाभाऊ ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, तालुका चिटणीस सुरेश घरत, तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे यांच्यासह शेकाप व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारी अर्जांच्या गर्दीने प्रशासनाची तारांबळ
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 21 जानेवारी असून, मंगळवारी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी एकाच वेळी अर्ज दाखल केल्याने तहसील कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी झाली. सकाळपासून उमेदवार व कार्यकर्त्यांनी परिसर फुलून गेला होता. परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाला टोकन पद्धतीचा अवलंब करावा लागला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. अलिबागमध्ये 50 हून अधिक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते.
