शक्तीपीठच्या मोजणीला मविआचा विरोध

पोलीस बळ वापरुन जमीन बळकावण्याचा प्रयत्न; जयंत पाटील, सतेज पाटील यांचा इशारा

| सोलापूर | प्रतिनिधी |

राज्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना त्यांच्या जमिनी घेण्यासाठी मात्र सरकारकडून पोलीस बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने शक्तिपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू असलेली मोजणी तातडीने थांबवावी, अन्यथा आम्ही स्वतः शेतात उतरून मोजणी रोखू, असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिला.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार रुपये देताना हात आखडता घेणाऱ्या सरकारला महामार्गासाठी निधी कुठून मिळतो? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते जयंत पाटील यांनी उपस्थित केला. जयंत पाटील, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शेतकऱ्यांनी ‌‘एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द‌’ आणि ‌‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची‌’ अशा घोषणा देत निदर्शने केली.

शेतकऱ्यांची संमती नसताना शेकडो पोलिसांचा ताफा नेऊन मोजणी करणे लोकशाहीला धरून नाही. महसूल प्रशासनाची कामे आता पोलीस करत असल्याचे चित्र आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. दुष्काळ निवारणाला प्राधान्य देण्याऐवजी सरकार एका व्यक्तीच्या हट्टासाठी महामार्गाचा आग्रह धरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महामार्ग कोणाच्या फायद्यासाठी?
शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 86 हजार कोटींवरून एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा सतेज पाटील यांनी केला. जमीन अधिग्रहणासाठीच 22 ते 28 हजार कोटी रुपये लागणार असताना, हुडकोकडून कर्ज घेऊन हा प्रकल्प कोणाच्या फायद्यासाठी राबवला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सोलापूर जिल्ह्यात जबरदस्तीने मोजणी केल्यास शेतात उतरून ती रोखण्याचा इशाराही त्यांनी दिला.
Exit mobile version