पाणीप्रश्नावर महाविकास आघाडीचे आंदोलन स्थगित

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

मंत्री गणेश नाईक यांच्या बैठकीनंतर निर्णय
मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक होणार

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पालिका हद्दीतील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या वतीने 17 मे रोजी कामोठे येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर हे आंदोलन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे यांनी दिली.

15 मे रोजी पनवेल महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसोबत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत तिन्ही प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत पनवेल शहरातील पाणीटंचाई, अपुरा पाणीपुरवठा आणि भविष्यातील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी पाणी प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री गणेश नाईक यांनी दिले. या आश्वासनानंतर महाविकास आघाडीने 17 मे रोजी होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

बैठकीला विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे, नगरसेवक प्रकाश म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, नगरसेवक हरेश केणी, तुषार पाटील, राम पाटील तसेच सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, पाणीपुरवठा अधिकारी कांबळे, विलास चौतालिया आणि पनवेल महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी चव्हाण उपस्थित होते.

Exit mobile version