| माणगाव | प्रतिनिधी |
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात रायगड जिल्ह्यात नावलौकिक कमाविलेल्या महाआराध्य प्रतिष्ठानतर्फे माणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा उमरोली – खरवली या शाळेची दहा हजार रुपये खर्च करून रंगरंगोटी करण्यात आली. त्यानिमित्ताने उमरोली शाळेत शनिवार दि.28 फेब्रुवारी रोजी कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना महाआराध्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद धारिया यांनी आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भावी नागरिक असल्याचे सांगितले.
महाआराध्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद धारिया, संचालिका अंकिता धारिया हे आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो, या उदात्त हेतूने आपल्या प्रतिष्ठानमार्फत विविध सामाजिक, शैक्षणीक उपक्रम सातत्याने राबवित असतात. राजिप उमरोली शाळेची रंगरंगोटी करण्याबाबत महाआराध्य प्रतिष्ठानला शिक्षकांकडून निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल प्रतिष्ठानने घेऊन उमरोली शाळेची चांगल्याप्रकारे रंगरंगोटी केली. याचे उत्तरदायित्व म्हणून शाळेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाआराध्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद धारिया यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रतिष्ठित व्यापारी विक्रांत गांधी, चारिझेन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन निर्मलसिंग रंधावा, किशोर झेमसे, शाळा व्यवस्थापन कमिटी, मुख्याध्यापक नीता काळोखे, शिक्षक प्रदीप आडीत, पालकवर्ग, विद्यार्थी, ग्रामस्थ बंधू-भगिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रदीप आडीत यांनी केले. तर मुख्याध्यापक नीता काळोखे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची उत्साहात सांगता केली.







