महाड: लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमध्ये स्फोट

| महाड | प्रतिनिधी |
एमआयडीसी-महाड औद्योगिक क्षेत्रातील दुर्घटनाग्रस्त असणारी लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमध्ये शनिवारी (दि.2जुलै) सकाळी नऊच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली.यामुळे संपूर्ण बिरवाडी परिसरातील जनता भयभीत झाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कंपनी शेजारी असणार्‍या आसनपोई गावातील व बिरवाडी परिसरातील नागरिकांनी त्वरित कंपनीच्या गेटवर धाव घेतली. यावेळी पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी उपस्थित होते. नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत कंपनी प्रशासनाला विचारणा केली असता कोणतेही ठोस उत्तर देण्यात आले नाही. यामुळे नागरिकांनी कोणतीही जीवित हानी होऊ नये म्हणून कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील वर्षी महापुराने हाहाकार घातलेला असताना देखील त्यावेळी या कंपनीमध्ये स्फोट झाल्याने आपली गावे व घरे सोडून पाच किलोमीटर लांब जाण्याची वेळ स्थानिकांवरती आली होती. अशा प्रकारे या कंपनीमध्ये वारंवार अपघात होत असून येथील स्थानिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असताना प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही यामुळे सर्व नागरिकांनी प्रशासन व कंपनी यांना सज्जड दम देऊन नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणार्‍या कंपनीला बंद करण्याचे आवाहन केले आहे अन्यथा बिरवाडी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Exit mobile version