| रायगड | खास प्रतिनिधी |
औद्योगिक वसाहतीमधील प्रसोल केमिकल्स या कारखान्यात विषारी वायूची गळती होण्याचा प्रकार गुरुवारी (दि.5) घडला. विषारी वायूची बाधा झाल्याने एका कामगाराचा मृत्यु झाला, तर चार कामगार बेशुद्ध पडले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबईत हलविण्यात आले आहे. उर्वरित तिघांवर महाड येथे उपचार सुरु आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
अखिल महेंद्र सिंग (व.25,रा.प.बंगाल) असे मृत कामगाराचे नाव आहे. संतोष मोरे (व.24,रा.महाड), पंकज डोळस (व.27,रा.पालेदापूर), परमेज ठाकूर (व.23,रा.उत्तरप्रदेश), इंद्रजीत पटेल(व.29, रा.उत्तरप्रदेश) अशी जखमींची नावे आहेत. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कारखान्यात हायड्रोजन सल्फाईड या वायूची गळती झाली. कारखान्यात काम करत असलेल्या पाच जणांना वायूची बाधा झाल्याने ते बेशुध्द पडले. त्यांना तातडीने महाड येथील न्यू लाईफ रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात येत असतानाच अखिलचा मृत्यू झाला. संतोष मोरे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबईत हलविण्यात आले आहे. उर्वरित तिघांवर न्यू लाईफ रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे.
या घटनेची नोंद औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीमध्ये या आधी सुमारे तीन वेळा अशा घटना घडल्या आहेत. वायुगळतीमुळे आरोग्यास धोका निर्माण झाल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी देखील ही कंपनी बंद करण्याची मागणी सातत्याने उचलून धरली होती. त्यानुसार कंपनी व्यवस्थापनाने सुरक्षेच्या उपायोजना केल्याचा दावा केल्यानंतर ही कंपनी पुन्हा सुरू करण्यात आली होती, परंतु आत्ताच्या या घटनेनंतर ही कंपनी कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.