महाडच्या लेकींचे वर्दीचे स्वप्न पुर्ण

दुर्गम भागातील संघर्षाला खाकीचे कोंदण; अस्मिता, सेजलची मुंबई पोलीसांत निवड

| महाड | प्रतिनिधी |

दुर्गम भागातील भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितीची सर्व कुंपणे ओलांडून महाड तालुक्यातील दोन लेकींनी थेट मुंबई पोलीस दलाला गवसणी घातली आहे. भेलोशी गावातील अगदी सामान्य कुटुंबातील अस्मिता रेवाळे आणि सेजल यादव या दोन तरुणींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, भेलोशी गावासह संपूर्ण पंचक्रोशीतून मुंबई पोलीस दलात भरती होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या असून, त्यांच्या या यशामुळे तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

भेलोशी हे महाड तालुक्यातील अत्यंत डोंगराळ आणि दुर्गम भागात वसलेले गाव आहे. अशा भागात राहून अस्मिता रेवाळे आणि सेजल यादव या दोघींनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण केले. घरची परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली आणि तिथे राहून दिवस-रात्र मेहनत घेतली. राजू बैकर यांची सुकन्या आणि सिद्धेश रेवाळे यांची पत्नी अस्मिता, तसेच सुनिल यादव यांची कन्या सेजल यांनी मुंबईच्या वेगवान वातावरणात स्वतःला सिद्ध केले. पहाटेचा खडतर मैदानी सराव आणि रात्रीचा लेखी परीक्षेचा अभ्यास असा कठीण दिनक्रम पाळत त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या कुटुंबीयांचाही मोठा वाटा आहे. या दोन रणरागिणींच्या उत्तुंग कामगिरीमुळे भेलोशी गावाला एक नवी ओळख मिळाली असून, संपूर्ण महाड तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील मुलींसाठी अस्मिता आणि सेजल यांचे हे यश अत्यंत प्रेरणादायी ठरणारे आहे.

लहानपणी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे, यामध्ये माझ्यासह कुटुंबातील सदस्यांनी मला मोलाची साथ दिली. भविष्यात या स्पर्धेत येणाऱ्या प्रत्येकाला मी नक्कीच मार्गदर्शन करेन.

सेजल यादव,
नवनियुक्त पोलीस शिपाई

मी पहिल्यापासून जिद्दीने या स्पर्धेत उभी होते. यामध्ये माझे वडील, आई, पती आणि कुटुंबाने माझ्यावर पूर्ण विश्वास दर्शवला. 2023 मध्ये दिलेल्या परीक्षेत अपयश आले होते; परंतु, त्यानंतर अधिक जिद्द आणि चिकाटीने आज मुंबई पोलीस भरतीमध्ये यशस्वी झाले. भविष्यात आपल्या भागातील युवक आणि युवतींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत उतरावे.

अस्मिता रेवाळे-बैकर,
नवनियुक्त पोलीस शिपाई
Exit mobile version