रायगडमधील नैसर्गिक तथा ऐतिहासिक संपदेची होरपळ

मानवनिर्मित वणव्यांमुळे मोठे नुकसान
पर्यावरण तथा इतिहासप्रेमींमध्ये नाराजी

। पाली/बेणसे/सुतारवाडी । वार्ताहर ।

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या नैसर्गिक तथा ऐतिहासिक संपदेचे वरदान लाभलेल्या रायगड जिल्ह्यात मानवनिर्मित वणव्यांची दाहकता दिवसागणिक वाढत असहे. मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील माणगाव, रोहा, सुधागड अशा विविध तालुक्यातील बहुतांश भागांत लागलेल्या मानवनिर्मित वणव्यांमुळे वनसंपदा, जैवविविधता तसेच ऐतिहासिक वस्तूंची होरपळ झाली आहे. पशूपक्षी यांच्या अधिवासासोबतच मानवी संपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. या प्रकारांमुळे पर्यावरण तथा इतिहासप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे. पालीतील सरसगड किल्ल्यावर नुकताच प्रचंड मोठा मानवनिर्मित वणवा लागला. हा वणवा 24 तासांहून अधिक काळ सुरू होता. स्थानिक नागरिक व वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी वणवा विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यामुळे किमान वणवा मानवी वस्तीत आला नाही.

मात्र किल्लयाचा बहुतांश भागाला याची झळ बसली. यामध्ये किल्ला परिसरात नव्याने लावलेले रोपे व संवर्धन केलेली झाडे जळून खाक झाली. शिवाय येथील माकडे, वानरे व पक्ष्यांच्या अन्नाचा प्रश्‍न निर्माण होण्यासोबतच त्यांचा अधिवास देखील नष्ट झाला. याशिवाय तालुक्यातील ताडगाव दुधणी येथे डोंगरावर खूप मोठा वणवा लागला होता. यामध्ये भाताचे माच, पेंढा, गवत, लाकूडफाटा व कुंपण जळून खाक झाले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी रोहा तालुक्यातील वरसे, कोलाड, पुई आंबेवाडी आदी विविध भागांत वणवे लागून वनसंपदेचे नुकसान झाले आहे. सुतारवाडी पासून विळा -भागाड 10 कि.मी. अंतरावर आहे. एम.आय.डी. सी पासून काही अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा अनेक लहान मोठी झाडे आहेत. या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा वणवा लागल्याने हजारो वृक्ष आगीच्या भक्षस्थानी गेले. ही आग इतकी मोठी होती ती वार्‍याने पसरत जावून सुमारे तीनशे एकरातील लहान-मोठी झाडे आगीच्या भक्षस्थानी जावून राख झाली.

जंगलातील रान मेवा आता दुर्मिळ झाला आहे. आंबे, काजू, फणस, करवंद, जांभळं ही फळं आता क्वचितपणे चाखायला मिळत आहेत. पशु-पक्षी यांचे निवारे नामशेष झाले आहेत. हे वणवे जाणीवपूर्वक लावले जात असून यांवर कोणाचेही अंकुश नसल्यामुळे कोणालाही आता भिती वाटत नसल्यामुळे अगदी बिनधास्तपणे वणवे लावले जातात. वनव्यांमुळे जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे गड-किल्ल्यांचे व ऐतिहासिक ठेव्यांचे बांधकाम कमकुवत होऊन ते ढासळण्याची भीती असते. किल्याच्या तटबंदीवर, बुरुजांवर उगवलेले गवत जळाल्यामुळे त्यांचे नुकसान होते. वणवे लागल्यामूळे कल्ले व ऐतिहासिक वास्तूंवरील मोठ्या प्रमाणात वनसंपदा देखील नष्ट होत आहे. त्यामूळे येथे राहणार्या पशूपक्षांची अन्नपण्यासाठी खुप वाताहत होत आहे. येथे राहणारे मोर, माकड व भेकर हे प्राणी अन्नपाण्यासाठी दहिदिशा भटकतात.

बहुतांश वणवे मानवनिर्मित आहेत. वणवे रोखण्यासाठी व आपत्ती निवारणासाठी गावपातळीवर 10 तरुणांची टीम तयार करून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. मानवनिर्मित वणवे रोखण्यासाठी गावागावातील लोकांचे प्रबोधन व जनजागृती केली जात आहे. ग्रामपंचायतींना देखील आवाहन केले आहे. – दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली सुधागड

वणव्यांमुळे ऐतिहासिक वास्तू, वनसंपदा व जैवविविधतेचे प्रचंड नुकसान होत आहे. वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मानवनिर्मित वणवे सर्वाधिक आहेत. जे कोणी लोक वणवा लावत आहेत त्यांना शोधून कडक शासन करण्याची गरज आहे. गेली अनेक वर्षे सरसगड व इतर ठिकाणी लावलेली व संवर्धन केलेली झाडे सततच्या वनव्यांना बळी गेली आहेत. याचे खूप दुःख होते. केतन म्हसके, उपाध्यक्ष, शिवऋण प्रतिष्ठान, महाराष्ट्र

Exit mobile version