महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना मारहाण

भाजप नगरसेवक सुरज बामणे यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

| महाड | प्रतिनिधी |

महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय सदाशिव कोळेकर यांच्यावर त्यांच्या दालनात झालेल्या मारहाणीप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कोळेकर जखमी झाले असून त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर हे महाड नगरपालिकेच्या प्रशासकीय भवनातील त्यांच्या दालनात कामकाज करत असताना भाजपचे नगरसेवक सुरज बामणे, राकेश पाटील व त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती तेथे आली. प्रभागातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर वादाचे रूपांतर कथित मारहाणीत झाले.

तक्रारीनुसार, मुख्याधिकारी कोळेकर यांना मारहाण करण्यात आली तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेनंतर त्यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जखमी झालेल्या कोळेकर यांना वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी सुरज बामणे, राकेश पाटील आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, १२१(२), २२१, ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

या घटनेचा पुढील तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते करीत आहेत.

Exit mobile version