। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील शेलटोली येथील महिलेने सोमवारी 6 चिमुकल्यांना विहिरीत ढकलून स्वतःदेखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चिमुकल्यांचा नाहक बळी गेला आणि महिला बचावली. या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्हा हादरुन गेला होता. अनेक चर्चांना उधाण आले होते. अशातच नवरा सतत चारित्र्यावर संशय करीत असून तो मुलांना घरात ठेवून घेण्यास तयार नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे नवर्याकडून होणार्या जाचाला कंटाळून तिने मुलांचा जीव घेतला असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
आरोपी चिखरु साहनी याच्यासोबत रुना हिचे लग्न झाल्यानंतर 2010 सालापासून तो बायकोवर चारित्र्यावरुन संशय घेत होता. अनेकदा त्यांच्यात भांडणही होत. सोमवारी घटना घडण्यापूर्वी आरेापी चिखरु याने दारू पिवुन पत्नीला शिवीगाळ केली. तसेच मारहाण करीत घरातून हाकलून दिले. इतकेच नाही तर तुम्ही मेलात तरी मला फरक पडत नसल्याचे सांगितले. याशिवाय घरात येण्यास तंबी घातली. त्यामुळे नवर्याकडून होणार्या जाचाला कंटाळून महिलेने सहा मुलांना विहिरीत ढकलून दिले. तसेच स्वतःदेखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये सहा मुलांचा जीव गेला तर आई रुना बचावली. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक खोपडे अधिक तपास करीत आहेत.