आठ कर्मचार्यांना डेंग्यूची लागण
। महाड । प्रतिनिधी ।
महाड आगारात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे व त्यात पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती झाल्याने एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये काम करणार्या आठ कर्मचार्यांना डेंग्यूची लागण झाल्याने अनेक कर्मचार्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
कोकणातील मध्यवर्ती एसटी आगार म्हणून महाड आगाराची ओळख मागील पन्नास वर्षांपासून कायम आहे. मात्र, एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षपणामुळे महाड एसटी आगाराकडे मागील काही वर्षांपासून दुर्लक्ष केले गेले आहे. आधीच एसटी महामंडळाची जुनी इमारत डबघाईला आली आहे. त्यातच महामंडळाच्या जागेत नव्या इमारतीचे बांधकाम चालू झाले आहे. मात्र, महामंडळाकडे पैसे नसल्याने ठेकेदाराने काम अर्धवट सोडले आहे. परिणामी, प्रवाशांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महाड आगारातील जुन्या प्रवासी शेडपासून आगारातील वर्कशॉपपर्यंत मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत, त्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे.महाड एसटी आगाराच्या पाठीमागील बाजूस एका धनदांडग्या बिल्डरने मोठ्या प्रमाणावर भराव केल्याने एसटी महामंडळातून गटाराद्वारे वाहून जाणारे पावसाचे पाणी वाहून जाण्याचा निचरा बंद झाल्याने आगारात मोठ्या प्रमाणावर तळ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याला महाड नगरपरिषद कारणीभूत आहे, असे बोलले जाते. मात्र, नगर परिषदेवर सध्या प्रशासकीय राजवट असल्याने आंधळं दळतंय कुत्रं पीठ खाते अशी अवस्था नगरपरिषदेची झाली आहे.
महाड नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाचा कारभार हम करे सो कायदा असल्याने त्याचा परिणाम एसटी महामंडळातून प्रवास करणार्या प्रवाशांना पावसाळ्यात अनुभवण्यास मिळाला. पावसाळ्यात शासनाच्या पाण्याचा निचरा बंद झाल्याने गुडघाभर पाण्यातून ऐन पावसाळ्यात प्रवाशांना एसटी बसमध्ये प्रवेश करावा लागत होता. अनेक वेळा नगर परिषदेकडे तक्रार करूनदेखील बिल्डरधार्जिण्या नगरपरिषदेमुळे महाड एसटी आगाराला घाणीचे साम्राज्य प्राप्त झाले आहे, अशी चर्चा आहे. महाड एसटी आगारात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साठवून तळे निर्माण झाले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे व एसटी महामंडळाच्या बसेस स्वच्छतेमुळे निघणारे पाणीदेखील त्या ठिकाणी साचून राहात असल्याने त्याचा परिणाम महाड एसटी आगारातील वर्कशॉपमध्ये काम करणार्या कामगारांना भोगाव लागला. या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होऊन महाड एसटी आगारातील वर्कशॉपमध्ये काम करणार्या सुमारे आठ कर्मचार्यांना मागील पंधरा दिवसांपासून डेंग्यूची लागण झाल्याने अनेक कर्मचारी रजेवर गेले आहेत.
नगरपरिषद फवारणी करणार का?
आगारात साचलेल्या सांडपाण्याचा निचरा होण्याबाबत नगरपरिषदेनेदेखील गांभीर्याने दखल घेणे गरजेचे असताना व त्या ठिकाणी डास प्रतिबंधक धुराची फवारणी व कीटकनाशक फवारणी करणे गरजेचे होते. मात्र, नगरपरिषददेखील डेंग्यूची साथ पसरवण्यास हातभार तर लावत नाही ना, अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे.