महाड शिवसेनेचा गोगावलेंना पाठिंबा

| महाड | प्रतिनिधी |
शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या गटबाजीचे राजकारण आता शिगेला पोहोचले असून ठिकठिकाणी पाठिंबा सत्र सुरू झाले आहे. महाड पोलादपूर माणगाव चे आमदार भरतशेठ गोगावले हे देखील या बंडात सहभागी झाले असल्याने त्यांच्या समर्थक पदाधिकार्‍यांनी आज घेतलेल्या बैठकीत आमचा पाठिंबा भरत गोगावले  असा एकमुखी निर्धार केला. तर महाड तालुक्यातील अनेक पदादिकारी या बैठकीला अनुपस्थित राहिले असून त्यांनी सोशल मिडीयावर उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे जाहीर केले आहे.

सकाळी  गोगावले यांच्या निवासस्थानी शिवसेना पदाधिकार्‍यांची एक बैठक घेण्यात आली. यावेळी महाडचे तालुका प्रमुख सुरेश महाडिक, विजय सावंत, माजी सभापती विजय धाडवे, पंचायत समितीच्या माजी सभापती सपना  मालुसरे, तालुका संपर्क प्रमुख रवींद्र तरडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते, गोगावले यांच्या शिवनेरी निवासस्थनाबाहेर  झालेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपला रोष राष्ट्रवादी वर काढत जिल्ह्यात पालकमंत्री कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला. तीन वेळा आमदार झालेल्या भरत गोगावले यांना महाविकास आघाडीत मंत्रिपद मिळेल अशी आशा महाडकर नागरिकांना असताना देखील त्यांना मंत्रिपासून दूर ठेवून राष्ट्रवादीला मंत्रिपद दिल्याच्या राग यावेळी उपस्थित पदाधिकार्‍यानी व्यक्त केला.
 

जिल्ह्यात वारंवार निधी वाटपात देखील शिवसेनेवर कायम मागे ठेवले जात होते त्यातच   गोगावले यांच्याकडून केल्या जाणार्‍या कामांचे श्रेय लाटण्याचे काम पालकमंत्री करत असल्याचे तालुका प्रमुख सुरेश महाडिक यांनी स्पष्ट केले, आम्ही कायम भरत गोगावले यांच्या सोबत असल्याचा निर्धार केला. तर आम्ही शिवसेनेचेच पण शिवसेना संपवण्याचे काम काँग्रेस राष्ट्रवादी करत असल्याचा आरोप यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर यांनी केला.

बैठकीला सुमारे 300 पेक्षा अधिक पदाधिकारी उपस्थित असल्याचे दिसून आले. महाड पोलादपूर आणि माणगाव विधानसभा मतदार संघ असलेल्या या मतदारसंघातील अनेक पदाधिकारी मात्र अनुपस्थित असल्याचे दिसून आले. याबाबत कांही कारणास्तव हे पदाधिकारी अनुपस्थित असल्याचे तालुका प्रमुख सुरेश महाडिक यांना द्यावे लागले. तर शिवसेनेच्या अनेक पदाधिकार्‍यांनी आपल्या सोशल मिडीयाच्या अकाऊंट वरून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपला पाठींबा असल्याचे सांगितले आहे. यामुळे शिवसैनिक मात्र संभ्रमात असल्याचे दिसून आले. या बैठकीच्या निमित्ताने शिवनेरी निवासस्थानी आणि बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Exit mobile version