| माणगाव । वार्ताहर ।
महाड तालुक्यापासून 40 किमी अंतरावर आत रायगडच्या पायथ्याजवळ असणारी ऐतिहासिक गावे वारंगी, वाघेरी व पाने या गावांकडे जाणारा रस्ता जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला आहे.त्यामुळे वरील गावांतील ग्रामस्थांचा बाजारपेठ व महाड तालुक्याशी संपर्क तुटला असल्याचे मूळ पाने गावचे रहिवाशी व सध्या माणगाव स्थायिक झालेले येथील सामाजिक कार्यकर्ते रणधीर कनोजे यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले.
रायगडच्या पायथ्याजवळ असणारी वारंगी, वाघेरी व पाने या गावातील लोकांना महाड हि मोठी बाजारपेठ असून महाड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध शासकीय कामानिमित्त येथील ग्रामस्थांना महाडला यावे लागते.या ग्रामस्थांचा बिरवाडीपासून पुढे काही अंतरावर रस्ता खचल्यामुळे महाड बाजारपेठ आणि तालुक्याशी संपर्क तुटला आहे. या गावांतील लोकांची वाहतूक थांबल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.वरील गावांतील किरकोळ दुकानदारांचे देखील किराणा साहित्य संपले आहे.या गावात गेली आठ दिवस वीज नाही. लहान मुले अंधारात आहेत त्यामुळे वयस्कर ,अपंग ,विधवा,मोलमजुर या लोकांची परिस्थिती गंभीर व हलाखीची झाली आहे. तरी कोणाला मदत करायची असेल तर या गावातील लोकांना देखील मदतीची गरज आहे.हि गावे पूर्वपरिस्थितीमुळे व खचलेल्या रस्त्याच्या समस्यांमुळे संकटात असून दानशूर व्यक्ती,संस्था,संघटना,ट्रस्ट यांनी एक हात मदतीचा देऊन या गावांना सहकार्य करावे असे आवाहन कनोजे यांनी केले आहे.