महाड तारीख गार्डन इमारत दुर्घटना

रहिवासी न्यायाच्या प्रतीक्षेत
महाड | प्रतिनिधी |
महाड शहरातील पानसरे मोहल्ला परिसरामध्ये तारीख गार्डन या इमारतीच्या दुर्घटनेला 24 ऑगस्ट रोजी एक वर्ष झाले. या दुर्घटनेनंतर इमारतीमधील सर्व रहिवासी बेघर झाले आहेत. या घटनेला एक वर्षाचा कालावधी होऊनही या इमारतीमधील रहिवासी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
रहिवाशांनी केलेल्या मागणीप्रमाणे जलदगती न्यायालयांमध्ये सुनावणी करण्यात यावी, त्याचबरोबर शासनाने दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे त्वरित पुनर्वसन करण्यात यावे. या दोन्ही मागण्या दुर्घटनेला एक वर्ष होऊनही शासनाकडून पूर्ण करण्यात आल्या नाहीत. शासनाकडून आम्हा रहिवाशांची उपेक्षा केली जात असल्याची भावना तारीख गार्डनमधील रहिवाशांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली.
महाडमधील वेल कम हॉटेलच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला अ‍ॅड. सुरभी मेहता, अखत पठाण, बशीर चिचकर, रहिवासी जस्मीन बामणे, नदीम बांगी, सत्तार तरे आदी मान्यवर उपस्थित होते. 24 ऑगस्ट 2020 रोजी महाड शहरातील तारिख गार्डन पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अचानक कोसळली आणि या भीषण दुर्घटनेमध्ये 16 जणांना आपला जीव गमवावा लागला. इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्यामुळे अल्पावधीमध्ये, म्हणजे अवघ्या सात वर्षांत इमारत कोसळली असल्याचा आरोप करण्यात आला.
या इमारतीचा बिल्डर फारुख काझी,आर्किटेक्ट गौरव शहा, महाड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी दीपक झिंजाड, नगर अभियंता शशिकांत दिघे, वास्तुविशारद गौरव शहा आणि विवेक हजारे यांच्याविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नियमित कोर्टामध्ये केवळ तारखा पडत असून, न्याय मिळण्यास विलंब लागत आहे. या इमारतीमधील रहिवाशांचे पुनर्वसन आणि खटला जलद न्यायालयात सुनावणी करण्यात यावी, अशा दोन मागण्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आल्या.
या इमारतीमध्ये ज्यांनी सदनिका घेतल्या आहेत, त्यांनी बँकाकडून कर्ज घेतले आहे. त्यामुळे दुर्घटना घडूनही बँका कर्ज वसूल करीत आहेत. विमा कंपन्यांनी मानवनिर्मित चूक झाल्याचे कारण पुढे करीत नुकसान भरपाई देण्यास नकार कळविला आहे, अशा व्यथा तारिख गार्डन इमारतीमधील रहिवासी फातिमा देशमुख, अमजद खान हव्या व अन्य रहिवाशांनी मांडल्या.

Exit mobile version