। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहर आणि परिसराला पुरापासून मुक्त केले जाणार आहे. सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठी कधीही निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याची ग्वाही आ.भरत गोगावले यांनी दिली. महाड प्रांत अधिकारी कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या नागरिकांच्या सभेमध्ये ते बोलत होते.
सावित्री, काळ आणि गांधारी या तीन नदीपात्रातील गाळ काढण्यासंदर्भात शासकीय स्तरावर विविध उपाय योजले जात आहेत. त्यासंदर्भात विचारविनिमय करणे तसेच कामाच्या प्रगती संदर्भात माहिती देण्यासाठी गुरुवारी प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात आ.भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रांत प्रतिमा पुदलवार मुख्याधिकारी रोडगे, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता धनश्री राजभोज, महाड तहसीलदार काशीद, पोलादपूर तहसीलदार पूरनियंत्रण समितीचे प्रमुख प्रतिनिधी नितीन पावले, संजय मेहता,प्रकाश पोळ, समीर मेहता यांच्यासह महाड शहरातील व्यापारी, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी त्याचबरोबर ग्रामीण भागातून आलेले ग्रामस्थ उपस्थित होते.
गोगावले यांनी सावित्री, काळ आणि गांधारी या तीन नद्यातून मागील वर्षी मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला असल्याची माहिती देताना यावर्षी देखील गाळ काढण्याचे काम सुरू राहणार असल्याचे सांगितले. मागील वर्षी सुमारे 10 लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला. यावर्षी त्यापेक्षा अधिक काळ काढण्यात येणार आहे. यासाठी अधिक काळ काढण्यात येणार असून त्यासाठी सुमारे 31 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गाळ काढण्यासाठी जितका निधी आवश्यक आहे. त्याची पूर्तता पूर्ण करण्यासाठी आपण सर्व प्रकारे प्रयत्न करीत असल्याचे यावेळी सांगितले.
माजी नगरसेवक नितीन पावले यांनी पूर नियंत्रणासाठी कोणकोणते उपाय योजणे आवश्यक आहे याची माहिती सांगितली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये प्रकाश पोळ, समीर मेहता, संजय मेहता, संजय धनावडे, अॅड. सनी जाधव,अॅड. संजय भिसे,मोहन शेठ, दिनेश जैन यांनी सहभाग घेतला .
गाळ काढणे हाच पर्याय
यावर्षी केंबुर्लीपासून पुढे दासगाव पर्यंत वेगळ्या पद्धतीने गाळ काढण्यात येणार आहे. दरवर्षी महाड शहर आणि परिसरातील गावांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होतो हा धोका कशामुळे होतो याबाबत तज्ञांकडून पाहणी करण्यात आली असता विविध उपाय योजण्याचे सुचवण्यात आले आह.त्यातील महत्त्वपूर्ण उपाय म्हणजे नदीतील गाळ काढणे होय.हेच काम मागील वर्षापासून तातडीने हाती घेतल्यामुळे थोड्याफार प्रमाणात पुराची तीव्रता कमी झाल्याचे दिसून आले असल्याचे गोगावले यांनी सांगितले .