महादेवाचा मुरा अद्याप अविकसितच

अरूंद रस्त्यामुळे एसटी वाहतुकीस अडथळा


| पोलादपूर | प्रतिनिधि |

तालुक्यातील महादेवाचा मुरा हे ‌‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ गेल्या दहा वर्षांपासून चर्चेत येऊनही अविकसितच राहिले असून, गेल्या तीन वर्षांपासून पर्यटनविकासासाठी आवश्यक रस्तेवाहतुकीची सुविधा करण्यासाठी पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत सुमारे 3.5 कोटी रूपयांची तरतूद होऊनही अद्याप अरूंद रस्त्यामुळे एसटी बसने प्रवासी वाहतुकीस अडथळा होण्याच्या शक्यतेमुळे एसटी बस वाहतुकीसंदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहतूक निरीक्षकांमार्फत रस्त्याची बस वाहतुकीसंदर्भातील चाचणी करण्यात आली नाही. याठिकाणी महादेवाचे स्वयंभू मंदिर असून, महाशिवरात्री उत्सवानिमित्त हजारो भाविक येत असतात. त्यामुळे येत्या दि. 8 मार्च रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीपूर्वी रस्त्याची बस वाहतुकीसंदर्भातील चाचणी करण्यात येण्याची गरज आहे. मात्र, या अरूंद रस्त्यावर मोऱ्यांची संख्या पुरेशी असली तरी पुलांची संख्या घटल्याने मोठया वाहनांचा प्रवास कितपत सुखकर होईल, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

महादेवाचा मुरा येथील ग्रामस्थांनी तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे यांची मुंबई येथे मंत्रालयामध्ये थेट भेट घेऊन या गावाच्या रस्त्याची मागणी केली. साखर गोवेलेपासून महादेवाचा मुरापर्यंत रस्त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन रस्त्यासाठी आर.के. चंदनानी यांनी 2 कोटी 46लाख 32 हजार 144 रूपये आणि पुलासाठी संजय अनिल शेठ यांना 55 लाख 16 हजार 901 रूपयांची निविदा मंजूर होऊन कार्यारंभ आदेश दि.23 डिसेंबर 2021 रोजी देण्यात आले. या एकूण 3 कोटी 1 लाख 49 हजार 45 रूपये अंदाजे खर्चाच्या निविदांचे कार्यारंभ आदेश देऊनही काही महिने कामाला सुरूवात झाली नव्हती.

पोलादपूर तालुक्यातील बोरघर आणि गोवेले या दोन ग्रामपंचायतीमध्ये विभागलेल्या महादेवाचा मुरा या महादेव कोळी समाजाच्या लोकवस्तीच्या गावात रस्ता नेण्यासाठी माजी आमदार स्व. माणिक जगताप यांनी 2010 पासून केलेले प्रयत्न कालांतराने अर्ध्यावर सोडून देण्यात आले होते. याठिकाणी ऐतिहासिक पार्श्वभुमी असल्याने महादेवाचा मुरा या लोकवस्तीला क पर्यटन विकासाचा दर्जा देण्यात रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष पंडित पाटील यांनी प्राधान्य दिले. मात्र, या रस्त्यावर पावसाळयामध्ये दरडी कोसळून तसेच ओहोळ निर्माण होऊन झालेल्या नुकसानामुळे महादेवाचा मुरा येथील ग्रामस्थांना दुचाकी मोटारसायकली तर दूरच, पण चालत खाली उतरणेदेखील मुश्कील झाले होते. महादेवाचा मुराच्या ग्रामस्थांनी विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिकाही घेतली होती. मुख्यमंत्री सामाजिक ग्रामपरिवर्तन अभियानामध्ये बोरघर आणि गोवेले या दोन ग्रामपंचायतींचा समावेश असूनही दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये विभागलेल्या महादेवाचा मुरा या गावाचा विकास करण्याची राजकीय मानसिकता नसल्याने हे गाव वंचित राहिले आहे. त्यानंतर पावसाळयामध्ये महादेवाचा मुरा गावापर्यंत भगदाडं पडलेल्या रस्त्यावरून लोकवस्तीला अन्नधान्य व अन्य औषधोपचारासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने ग्रामस्थांची पायपीट सुरू झाली. येथील विद्यार्थी एस.टी.बसअभावी गोवेलेपर्यंत पायपीट करून साखर येथील माध्यमिक शाळेत शिकतात तर बेरोजगार तरूण बांधकाम व्यावसायिकांकडे मोटारसायकलींवरून जाऊन बिगारी कामगार म्हणून नोकरी करीत असल्याची माहिती प्राप्त झाली.

साखर गोवेले ते महादेवाचा मुरा यादरम्यान तयार झालेला रस्ता काही ठिकाणी सात ते आठ फूट रूंदीचा असल्याने तर मोऱ्यांची रूंदी पूर्ण नऊ फूट असल्याने तसेच वळणे काढण्यात न आल्याने एस.टी.बसने प्रवासी वाहतुकीस अडथळा निर्माण होणार आहे. या रस्त्यावर मोऱ्यांची संख्या लक्षणीय दिसून येत असताना केवळ एकच छोटा पूल बांधण्यात आला आहे. दुसऱ्या पुलाऐवजी दोन सिमेंट काँक्रिट पाईपाची मोरी उभारण्यात आली असून याठिकाणी डोंगरातून मोठया प्रमाणात भूस्खलन झाल्याचे दिसून येत आहे. या वळणावरील पुलावरून एस.टी. बस चढून वरील दोन पाईपांच्या मोरीवरून मार्गस्थ होताना वेग मंदावल्यास मागील भागात घसरत येऊन दरीत कोसळण्याची शक्यता दिसून येत आहे.

लवकरच एसटी बस सुरू करण्यासाठी चाचणी
प्रभारी डेप्युटी इंजिनियर अमृत पाटील यांच्याकडे चौकशी केली असता महोदवाचा मुरा ते गोवेले तळयाची वाडी या रस्त्याच्या कामात एका पुलाची आवश्यकता आहे. तशी मागणी सरकारकडे केली असून, अद्याप प्रतिसाद मिळत नाही. महाड येथील एस.टी. आगारप्रमुखांकडे एस.टी.बसद्वारे प्रवासी वाहतूक या रस्त्यावरून शक्य आहे काय, याबाबत चाचणी घेण्याकामी पत्र देऊन महादेवाचा मुरा येथील ग्रामस्थांची एस.टी.सुरू करण्याची मागणी पूर्ण करण्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. या रस्त्याची रूंदी कमी असल्याने एस.टी.बसचे दोन्ही बाजूचे टायर रस्त्याऐवजी साईडपट्टीवरून गेल्यास वाहतुकीस तसेच रस्त्याच्या टिकाऊपणास धोका निर्माण होईल, असे निदर्शनास आणून दिल्यानंतर रस्ता मजबूत असल्याची ग्वाही डेप्युटी इंजिनियर अमृत पाटील यांनी दिली.
महसुली गाव अन्‌‍ आदिवासी ग्रामपंचायत होण्याची गरज
गोवेले आणि बोरघर ग्रामपंचायतीींमध्ये विभागलेल्या मतदारांची ही महादेव कोळी समाजाची लोकवस्ती असून बोरघर ग्रामपंचायतीने या लोकवस्तीतील बंडू पारधी यांना सरपंचपद बिनविरोध दिले आहे. या महादेवाचा मुरा लोकवस्तीला अद्याप महसुली गावाचा दर्जा मिळाला नाही. पोलादपूर तालुक्यातील पांगळोली गांवाची मतदार संख्या सर्वात कमी असताना ग्रामपंचायतीचा दर्जा आहे; त्या तुलनेमध्ये जास्त मतदारसंख्या असूनही बोरघर आणि गोवेले ग्रामपंचायतीमध्ये विभागलेल्या मतदारसंख्येच्या महादेवाचा मुरा लोकवस्तीलाही आदिवासी ग्रामपंचायतीचा दर्जा मिळण्याची गरज आहे.
Exit mobile version