युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणणारा पहिला वैमानिक महाडकर

| महाड | जुनेद तांबोळी |
रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि भारतात एकच गोंधळ निर्माण झाला. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेते असंख्य भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले. त्यांना भारतात परत आणण्याचे आव्हान भारत सरकारसमोर होते. त्यासाठी ऑपरेशन गंगा राबविण्यात आले. भारताच्या काही जिगरबाज वैमानिकांनी हे आव्हान स्वीकारले. या वैमानिकांमध्ये एक महाडकर होता. भारतातून ज्या पहिल्या विमानाने युक्रेनच्या दिशेने झेप घेतली होती त्या विमानाचा वैमानिक होता सुमित सुधीर माळवदे. महाड शहरातील तांबड भूवन येथे त्याचे कुटुंब रहायचे.

वैमानिक होण्याचे स्वप्न
वैमानिकच व्हायचे हे सुमितचे लहानपणापासूनचे स्वप्न. शास्त्र शाखेतून त्याने पदवी घेतली. नंतर निसर्गोपचाराचा पदविका अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला. क्लिनिकत हिप्नोथेरपीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील त्याने केला आहे. हे सर्व शिक्षण घेत असताना, आपल्याला वैमानिक व्हायचे आहे याचा विसर त्याने कधी पडू दिला नाही. जिद्दीने विमानोड्डणाचे प्रशिक्षण पूर्ण करीत व्यावसायिक वैमानिक म्हणून परवाना त्याने मिळवला. 2017 मध्ये तो एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून रुजू झाला. आतापर्यंत 2200 तास विमानोड्डणाचा अनुभव सुमितच्या गाठीला आहे.

23 फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला केला. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याना सुखरूप भारतात परत आणण्याची मोहीम सरकारने हाती घेतली. 26 फेब्रुवारीला एअर इंडियाच्या बोइंग 787 ड्रीमलायनरने युक्रेन सीमेवरील रुमानियाची राजधानी बुडापेस्टच्या दिशेने झेप घेतली. अन्य पाच वैमानिकांबरोबर या विमानाचे सुकाणू सांभाळत होता महाडकर सुमित माळवदे. सोबत होते 14 क्रु मेंबर, तीन इंजिनिअर आणि दोन सुरक्षा रक्षक. युक्रेनमधून मिळेल त्या मार्गाने, प्रसंगी पायपीट करुन रुमानियाची राजधानी बुखारेस्ट विमानतळापर्यंत पोहोचलेल्या 249 विद्यार्थ्यांना घेवून 27 फेब्रुवारीला हे विमान दिल्लीतील इंदिरा गांधी अंतर राष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर हजर होते. या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या चेहेर्‍यावरील आनंद समाधान देणारा होता असे सुमित सांगतो.

सुमितचे कर्र्तृत्व एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. कोरोना काळात जगातील विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना वंदे भारत मिशन राबविण्यात आले. या मिशनअंतर्गत पन्नास उड्डाणे करुन विविध देशांतून भारतीयांना परत आणण्याचे कामही सुमितने फत्ते केले आहे. याच काळात व्हेंटीलेटर्स आणि लसीचा कच्चा माल आणण्याची जबाबदारी देखील सुमितने पार पाडली आहे.

Exit mobile version