प्रचंड भीतीचे वातावरण
| महाड | प्रतिनिधी |
किल्ले रायगडाच्या पायथ्याच्या बाहुली गावात सुमारे एक किलो मीटरपेक्षा जास्त लांबीच्या ओसाड जमिनीवर गावानजीक भेगा गेल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली असून रात्री उशिरा याठिकाणी तहसीलदार व डीवायएसपी यानी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना धीर दिला. शनिवारी सकाळी प्रांताधिकारी प्रतिमा पुद्दलवाड भूगर्भीय शास्त्रज्ञांसमवेत गावाला भेट देत परिस्थितीची पाहणी केल्याचे ग्रामस्थ चंद्रकांत महाडिक यांनी सांगितले.
या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीला माहिती देताना श्री चंद्रकांत महाडिक यांनी स्पष्ट केले की सायंकाळी उशिरा गावाच्या उगवत दिशेला शेवंताबाई कडू यांच्या ओसाड शेतजमिनीतील सुमारे एक किलोमीटर लांबीच्या भेगा गेल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यावर त्याची तातडीने माहिती स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आली. ही माहिती समजताच तहसिलदार सुरेश काशीद, नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी पोलीस उपअधिक्षक नीलेश तांबे यांच्यासमवेत रात्री उशीरा अकरा वाजता भेट देऊन प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला. बाहुली गावांची संख्या सुमारे दोनशे आहे.या गावांना जोडणार्या छोट्या पुलांबाबत गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या मागणीपैकी सांदोशी गावाकडे जाणार्या मार्गावरील पुलाची निर्मिती अद्याप झालेली नाही. मात्र वारंगी निजामपूर या गावांना जोडणारा पूल बांधून तयार झाल्याने गावांतील विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना शाळेमध्ये जाणे शक्य होणार असल्याचे श्री महाडिक यांनी स्पष्ट केले .
ग्रामस्थांचे स्थलांतर होणार
या झालेल्या घटनेची गंभीर दखल स्थानिक प्रशासनाने घेतली असून ग्रामस्थांशी संवाद साधून संबंधित गावातील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबतचा निर्णय होणार आहे. सांगण्यात आले असले तरीही गावालगत जमिनी वरील सरळ मार्गावर गेलेल्या या भेगांमुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्या संदर्भात भूगर्भीय शास्त्रज्ञांच्या अहवालानंतरच निर्णय होईल असे सांगण्यात आले आहे.
तीन दिवसांपूर्वीच महाड तालुक्याच्या वरंध घाटामध्ये झालेल्या दरड कोसळण्याच्या तर दुसर्या दिवशी तरतुदी मार्गावरील दरड कोसळण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रायगड विभागात झालेल्या या घटनेने तालुक्याच्या चालू वर्षीच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीला सुरूवात झाल्याचीही चर्चा सुरू झाली असून प्रशासनाकडून आपत्तीसंदर्भात तातडीने उपाययोजना केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.