| महाड | प्रतिनिधी |
संपूर्ण राज्यासह महाड-पोलादपूर तालुक्यातील बारचालक व परमीट रूम परवानाधारक हॉटेल व्यावसायिकांमध्ये व्हॅट, उत्पादन शुल्क आणि परवाना शुल्कात 15 टक्क्यांपर्यंत झालेल्या वाढीमुळे संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे ठराविक बिअर शॉपी, चायनिज हॉटेल्स व ढाब्यांवर अनधिकृतरित्या मद्यविक्री व मद्य पिण्यासाठी बैठक व्यवस्था केली जात आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये बेकायदेशीररित्या मद्य विक्री देखील होत आहे. अशी भयानक परिस्थिती असताना महाड उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी मात्र, कोणतीही ठोस कारवाई करण्याऐवजी कार्यालयीन वेळेत कार्यालयाला चक्क कुलूपबंद करुन गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
महाड शहरात फक्त दोनच परवाना असलेली वाईन शॉप्स आहेत. या दुकानांमधून विक्री होणारी सर्व प्रकारची मद्ये गावोगावी नेली जात असून, तालुक्यात असंख्य अनधिकृत दारू अड्डे फोफावले आहेत. परिणामी, तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर दारूच्या आहारी गेला आहे. तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा अभाव असल्याने स्थानिकांमध्ये संताप पसरला आहे. त्यातच कार्यालयीन वेळेत शासकीय कार्यालयालाच टाळे लावून अधिकारी व कर्मचारी नेमके कोणत्या अशा कामगिरीवर गेले होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा प्रकार गंभीर मानला जात असून, सुज्ञ नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे. कृषीवल प्रतिनिधीने महाड उत्पादन शुल्क कार्यालयाचे उप निरिक्षक रश्मिन समेळ यांच्याशी याप्रकरणी संपर्क केला असता, ते पूर्णतः गोंधळले आणि त्यांनी आमच्या साहेबांशी बोलतो असे सांगत आपल्या वरिष्ठांकडे फोन दिल्यावर त्यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे देत फोन कट केला.






