पेशवेकालीन चिरनेरचा महागणपती

| चिरनेर | वार्ताहर |

ऐतिहासिक वारसा बरोबरच चिरनेरच्या भूमीला प्राचीन देवस्थानचा परिसस्पर्श झाला आहे. श्री महागणपतीचे देवस्थान अत्यंत पुरातन असून, मंदिरात श्री महागणपती विराजमान आहेत. पेशव्यांच्या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गणेशाची मंदिरे उभारण्यात आली. चिरनेर येथील गणपतीच्या मंदिराची निर्मिती पेशवे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत झाली. नोव्हेंबर 1758 ते फेब्रुवारी 1759 मध्ये नानासाहेब पेशवे स्वतः कोकणात फिरलेले दिसून येतात.

वसईच्या विजयानंतर कोकणातील उरण व कर्नाळा प्रांताचा कारभार नानासाहेबांचे सुभेदार रामजी पंत फडके यांनी चालविला. हा कारभार करताना त्यांनी अनेक ठिकाणी देवळे बांधली. तसेच देवळांचा जीर्णोद्धार केला. चिरनेर येथील गणपती मंदिर हे हेमाडपंथीय धाटणीचे दिसून येते. देवगिरीच्या रामदेवरावांचे हेमाडपंत हे प्रधान होते. त्यांनी विशिष्ट प्रकारचे देऊळ बांधण्याचे स्थापत्य प्रगत केले. देऊळ बांधताना चुना मातीचा वापर न करता दगडी चिऱ्यांचा उपयोग करून देवळाची निर्मिती केलेली आहे. या पद्धतीला हेमाडपंथीय धाटणीचे मंदिर हे नाव रूढ झाले. मंदिराचे बांधकाम पूर्णपणे शास्त्रशुद्ध असून, जिर्णोद्धाराच्या वेळी यात कोणताही बदल केलेला नाही. मुख्य देऊळ मात्र पूर्वीसारखेच सुरक्षित आहे.आतील गाभाऱ्यात वरच्या कळसाच्या बाजूस अष्टकोनी नक्षीकाम साधून, कमळ पाकळ्यांनी घुमटीचा आकार घेतला आहे.

त्यामुळे त्यात घुमणारे ओमकार व शंखनाद एक वेगळेच चैतन्य निर्माण करते. गणरायाची मूर्ती पूर्वाभिमुख असून, डाव्या सोंडेची व अतिशय लोभसवाणी आहे. चिरनेर येथील महागणपतीचे तीर्थस्थान हे पेशवेकालीन असल्याचा दाखला मिळत असला, तरी महागणपतीचे मंदिर हे पेशवे काळात बांधले आहे. मात्र महागणपतीची मूर्ती अत्यंत पुरातन असल्याचे दिसून येते. मुळपाड्यात गणपतीचे देऊळ बांधले, तेव्हा आगरी समाज एकवटला. देवळाच्या निर्मितीने मूळगाव वसले. चिरनेर मंदिराचे पुजारी आगरी समाजाचे आहेत. नानासाहेब पेशवे हे गणपतीला आपले आराध्य दैवत मानत. त्यांनी गणपती उत्सव सुरू केला. श्री महागणपतीची मूर्ती आज बहुजन समाजाची आराध्य दैवत बनली आहे. पूर्वी गणपतीला कौल लावायचे, याचा निर्णय गणपती देत असे. माघ उत्सवातील चतुर्थीला येथे श्री गजानन प्रत्यक्ष भोजनास येतात. अशी श्रद्धा असल्याने, या दिवशी भक्तांची गर्दी असते. या दिवशी श्रींना महानैवद्य आणि त्याच दिवशी सर्व गणेश भक्तांना महाप्रसादाचा लाभ दिला जातो. हे गणपती देवस्थान अत्यंत जागृत असून, या ठिकाणी आलेल्या भक्तांची दुःखे निश्चित दूर होतात. अशी श्रद्धा आहे. असे अनुभवही या गणेशाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना आलेले आहेत.

Exit mobile version