। पाली/ वाघोशी । प्रतिनिधी |
महागाववरुन पालीकडे जाणाऱ्या बसचा शुक्रवारी (दि. 12) सकाळी ब्रेक फेल झाला. मात्र, चालक व वाहकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या निष्काळजी कारभाराबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
महागाववरून सकाळी 8.30 वाजता पालीकडे सुटलेली एस.टी. बस ही कवेळे आदिवासी वाडी जवळील नागमोडी वळणावर पोहोचताच अचानक ब्रेक फेल होऊन थरारक घटना घडली. बसमधील शेकडो प्रवासी मृत्यूच्या छायेत असताना वाहनचालक गणेश करमरकर व वाहक रतिलाल गांगुर्डे यांनी अपार धैर्य, प्रसंगावधान दाखवत गाडी सुरक्षित ठिकाणी थांबवली आणि प्रवाशांचा जीव वाचवला. या घटनेत प्रवाशांमध्ये थकाप उडाला परंतु, चालकाच्या धाडसामुळे मोठा अपघात टळला. तथापि, या घटनेनंतर प्रवाशांचा रोष उसळला आहे. ग्रामीण भागातील मार्गावर नेहमीच नादुरुस्त व जीर्ण बसेस पाठवून एस.टी. महामंडळ प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याची प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक प्रवासी म्हणाले की, “प्रवास करताना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. सुरक्षित प्रवासाचा अधिकार असतानाही महामंडळाने सतत निकृष्ट व जुनी वाहने आमच्यावर लादली आहेत. ही केवळ प्रवाशांचा अपमानासमान बाब आहे.” अपघात टळला म्हणून महामंडळाला सुटकेचा श्वास सोडता येणार नाही. प्रवाशांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या अशा बेफिकीर व निष्काळजी धोरणावर तातडीने कारवाई व्हावी, अन्यथा प्रवाशांचा संताप मोठ्या आंदोलनात परिवर्तित होईल, अशी चर्चा प्रवाशांमध्ये रंगली आहे. दरम्यान, वाहनचालक गणेश करमरकर यांच्या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी जीवावर उदार होत गाडी थांबवली नसती, तर या अपघातात कित्येक बळी गेले असते, असा सूर प्रवाशांनी व्यक्त केला. मात्र, चालक व वाहकाच्या धाडसामुळे मृत्यूच्या दाढेतून शेकडो प्रवासी थोडक्यात सुटले.







