महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाचा महासोहळा

| खारघर | दीपक घरत |

खारघरच्या 400  एकर परिसरात विस्तारलेल्या सेंट्रल  मैदानात  लाखो  श्रीसदस्यांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या साक्षीने एक महासोहळा रंगला. निमित्त होते महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाचे. निरुपणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे थोर निरुपणकार पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (दि.16) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि लाखो श्रीसदस्यांच्या साक्षीने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सोहळा याचि देही, याचि डोळा पाहून उपस्थित लाखो श्रीसदस्य कृतार्थ झाले. रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता कार्यक्रम संपेपर्यंत एका शिस्तीने हे श्रीसदस्य एका जागी स्थानापन्न होते. अखेरच्या श्‍वासापर्यंत मी आणि माझे कुटुंबिय समाजप्रबोधनाचा वसा यापुढेही अव्याहतपणे सुरुच ठेवू, असा निर्धारही आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केला. पुरस्कारात मिळालेल्या 25 लाखांचा निधीही त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द केला.

पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला


अमित शाह यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, मानपत्र आणि 25 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून आप्पासाहेबांना सन्मानित करण्यात आले. मात्र अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुरस्कारात मिळालेली मानधनाची 25 लाख रूपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिल्याची मोठी घोषणा केली.

आप्पासाहेबांमुळे जगण्याची प्रेरणा- शाह


थोर निरुपणकार  आप्पासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन लाखो लोकांना जगण्याची प्रेरणा देण्याचं काम मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, असे गौरोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी काढले. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाजाला दिलेली शिकवण ही शाश्‍वत आहे. धर्म आणि मंत्रोच्चारांनी दिलेली शिकवण ही अल्पजीवी ठरत असते. दुसर्‍यांसाठी जगणारी माणसं या जगात कमी आहे, असेही ते म्हणाले. कोणत्याही प्रसिद्धीशिवाय आणि आकांशाविना सार्वजनिक जीवनात काम करणार्‍या एका समाजसेवकाच्या प्रेमापोटी आलेला जनसागर मी प्रथमच पाहिला आहे. 42 अंशाच्या तापमानात सुद्धा लोकांच्या मनात आप्पासाहेब यांच्याबद्दल मान, सन्मान आणि भक्तीभाव आहे. असा मान, सन्मान आणि भक्तीभाव केवळ त्याग, सेवा आणि समर्पणानेच मिळतो, असे ते म्हणाले.


थोर निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देवून गौरव होत आहे आणि हा पुरस्कार आप्पासाहेब यांना देताना मला फार अभिमान वाटतो आहे, असे उद्गारही शाह यांनी यावेळी काढले.  आप्पासाहेब यांना देण्यात येणार्‍या या पुरस्कार सोहळ्यासाठी लाखो लोकांचा समुदाय भर उन्हात बसलेला मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलं नाही. या सर्व श्री सदस्यांच्या मनात आप्पासाहेबांबद्दल किती प्रेम आहे हे दाखवीत आहे. असं म्हटलं जात की गर्दी जमविण्यापेक्षा गर्दी जमेल अशी कामे करा, आणि ही कामे आप्पासाहेब आपण केले आहे, असेही शाह यांनी नमूद केले.

भक्तीचा प्रसार करण्यामध्ये समर्थ रामदास स्वामी असतील, संत तुकाराम, संत नामदेव महाराज यांनी हे कार्य सुरू ठेवले होते, यानंतर देशाच्या लढ्यात आपले योगदान देणारे क्रांतिकारी महाराष्ट्रातून लाभले आहेत. संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सोबत घेवून नानासाहेब धर्माधिकारी आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाज सुधारण्याचे काम पुढे सुरूच ठेवले आहे, ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे. असेही शाह यांनी सांगितले.

लक्ष्मीची कृपा एका कुटुंबावर अनेक वर्षे राहते. एकाच कुटुंबात अनेक वीर एकानंतर एक जन्म घेतात. आणि वीर कुटुंब तयार होते. पण, समाजसेवेचा संस्कार तीन पिढ्यांपर्यंत राहतो, हे पहिल्यांदाच पाहिले आहे. पहिल्यांदा नानासाहेब नंतर आप्पासाहेब आता सचिनभाऊ आणि त्यांचे दोन बंधू हे संस्कार पुढे नेत आहेत.

अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री


हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
 नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा भव्य कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरता महापालिका, सिडको, सार्वजनिक बांधकाम, पोलिस, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि श्रीसदस्यांनी तयारी केली होती. या कार्यक्रमात आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.

पुरस्कार हा केलेल्या कार्याची पोचपावती- आप्पासाहेब


नानांच्या जडणघडणीमध्ये आपण दिलेली साथ आणि समर्थांचे विचार याची पावती म्हणजेच हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे. आज समाजाचे, देशाचे आणि आई वडिलांचे ऋण फेडण्यासाठी आपण काम केलं आहे. ते केलं पाहिजे, केल्याने होत आहे. समाजसेवा हेच श्रेष्ठ काम आहे,असे प्रतिपादन  त्यांनी सांगितले.

1943 साली नानासाहेब यांनी खेडेगावातून सुरुवात केली आहे. यासाठी कोणत्याही प्रसिद्धीची गरज नाही. मानवता रुजविण्यासाठी आत्मीयता महत्वाची आहे आणि त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत हे कार्य आम्ही कुटुंबीय आपल्या साथीने सुरूच ठेवणार आहोत, अशी ग्वाही आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी या निमित्ताने दिली.

अखेरच्या श्‍वासापर्यंत कार्यरत राहणार
या पुरस्कार सोहळ्याच्या नियोजनाबद्दल मी सरकारचा ऋणी आहे, त्यांनी समाजसेवेसाठी एक नवी ऊर्जा देण्याचा संकल्प केला आणि तो सत्यात उतरविला. मला मिळालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारचे श्रेय हे आपल्या सर्वांना जात असल्याचे मत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. एका घरात दोन वेळा पुरस्कार दिला जातो अशी घटना कुठेही झाली नसल्याचे धर्माधिकारी म्हणाले. आम्ही कामाची सुरुवात ही खेडेगावापासून सुरु केली. मी प्रसिद्धीपासून लांब आहे. वस्तू महत्वाची असेल तर तिची जाहीरात करायची गरज काय आहे, असे धर्माधिकारी म्हणाले. नानासाहेब वयाच्या 87 वर्षापर्यंत काम करत होते. माझा श्‍वास असेपर्यंत हे कार्य सुरु राहणार आहे. असं देखील ते यावेळी म्हणाले.

वृक्षारोपण करा
पर्यावरण महत्वाचे का आहे, आपल्या स्वताला मोकळा श्‍वास घेण्यासाठी आपण वृक्ष लावले पाहिजेत. येणार्‍या पावसाळ्यात प्रत्येकाने किमान 5 झाडे लावून ती जागविली पाहिजे. हवा शुद्धीकरणाचे काम झाडांच्या माध्यमातून निसर्ग करीत असतो, असे आवाहनही त्यांनी केले.

आपल्या समाजसेवी कुटुंबाचा राज्य सरकारने केलेला गौरव हा कौतुकास्पद आहे आणि हे कौतुक मिळविण्यासाठी आपल्याला समाजासाठी पुढे सरसावले पाहिजेच. त्यानंतरच भारत माझा देश आहे, माझा देश महान आहे हे सत्यात उतरेल, असे ते म्हणाले. आज पाणी वाचविण्याची गरज मोठ्या प्रमाणावर आहे, त्यासाठी सर्वांनी पुढे सरसावले पाहिजे,असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

भरकटलेल्या समाजाला दिशा- मुख्यमंत्री


अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी, ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या कुटुंबांचं मोठं योगदान आहे. उद्ध्वस्त होणारी लाखो कुटुंब, भरकटणार्‍या कुटुंबांना दिशा देण्याचं काम आप्पासाहेबांनी, नानासाहेबांनी केलं. आता सचिनदादा त्यांचं कार्य पुढे नेत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

या लाखो कुटुंबामध्ये माझंही एक कुटुंब होतं. माझ्या कुटुंबावर जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळला, तेव्हा मला ठाण्यात धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी आधार दिला. तर, आप्पासाहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला या समाजाची सेवा करण्यासाठी मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली. म्हणूनच मी आज तुमच्यासमोर एक मुख्यमंत्री म्हणून नाही तर श्री सदस्य म्हणून उभा आहे, असे त्यांनी नमूद केले.

सूर्य आग ओकत असताना एकही माणूस जागेवरुन उठत नाही हे आप्पासाहेबांचे आशिर्वाद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शिस्तीचे पालन सर्व सदस्य करत आहेत. माझी पत्नी आणि मुलगा श्रीकांत समोर बसला आहे. इथं लहान मोठा कोणी नाही. सगळे सदस्य म्हणून समोर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

धर्माधिकारी कुटुंब भरकटलेल्यांना मार्ग दाखवणारे दीपस्तंभ आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यामुळं पुरस्काराची उंची वाढली आहे. महाराष्ट्राचा मान सन्मान वाढला आहे. मी मुख्यमंत्री असताना आप्पासाहेबांना पुरस्कार दिला जात आहे, यापेक्षा दुसरा कोणताही आनंदाचा क्षण असू शकत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. माणूस घडवण्याचे विद्यापीठ म्हणजे मुक्काम पोस्ट रेवदंडा आहे.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आध्यात्मिक शक्ती मोठी
आप्पासाहेबांची जादू पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. राजकीय शक्तीपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी, त्याचे उदाहरण आपण पाहत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आजच्या कार्यक्रमाचे रेकॉर्ड आप्पासाहेबांचे सदस्यच मोडू शकतात. या महासागरामध्ये तुमच्या सर्वात देव दिसत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

या कार्यक्रमास  सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे तसेच राज्यातील इतर राजकीय पक्षांचे नेते आणि श्रीसदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांनाही या पूर्वी ममहाराष्ट्र भूषणफ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या मुळे एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. खारघरच्या भव्य मैदानावर आयोजित या कार्यक्रमासाठी राज्य भरातून श्रीसदस्य आले होते. या वेळी प्रचंड ऊन असूनही धगधगत्या उन्हात सुद्धा बिना विचलित होता जमिनीवर बसून संपूर्ण कार्यक्रम  पाहणार्‍या श्रीसदस्यांनी आप्पासाहेबांवर असलेल्या आपल्या निष्ठेचे दर्शन या वेळी केले

 मन स्वच्छ करण्याची अद्भुत कला- उपमुख्यमंत्री


जगात सात आश्‍चर्ये आहेत. मात्र श्री सदस्यांची ही अलोट गर्दी हे जगातील आठवे आश्‍चर्य आहे. पैशापेक्षाही खरी श्रीमंती काय हे या श्री परिवाराकडे आणि उपस्थित श्रीसदस्यांकडे बघून समजते. निरुपणाच्या माध्यमातून सकारात्मक विचार करण्याची ऊर्जा दिली जाते. मन स्वच्छ करण्याची  अद्भुत कला आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडे असल्याचे उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून धर्माधिकारी कुटुंबीय व प्रतिष्ठान करीत असलेले कार्य महान आहे. वृक्षारोपण, स्वच्छता, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्ती, रक्तदान अशा अनेक क्षेत्रात त्यांचे उत्तुंग काम आहे. देश-विदेशातही त्यांचे मोठे सामाजिक कार्य आहे.आपली भारतीय संस्कृती महान आहे. या संस्कृतीचे आप्पासाहेबांच्या माध्यमातून अद्भुतरित्या जतन आणि संवर्धन होत आहे. आप्पासाहेब स्वारीना प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे महत्व आज निश्‍चितच वाढले आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस सांगितले.

धर्माधिकारी मोठा चुंबक


सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मनुगंटीवार यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, आप्पासाहेबांच्या निरुपणाचा भक्ती सागर पाहण्याचा योग आज आला. आप्पासाहेब धर्माधिकारी नावाचा जगातील सर्वात मोठा चुंबक आज या व्यासपीठावर आहे. निरुपणाच्या माध्यमातून जसे आप्पास्वारी मन स्वच्छ करतात तसं ते परिसरही स्वच्छ ठेवतात. झाडे लावून पर्यावरणसुद्धा वनयुक्त करता तेव्हा असे कोटीकोटी पुरस्कार दिले तरी त्यांचा गौरव शब्दांने होऊ शकणार नाही. हाताला सेवेचे काम देऊन भविष्य घडविणार्‍या आप्पासाहेबांना सांस्कृतिक कार्य विभागाचा पुरस्कार देताना प्रचंड स्फूर्ती प्राप्त होत आहे.

बैठकीच्या माध्यमातून कार्य


डॉ. सचिन धर्माधिकारी म्हणाले की, मन, मानव व मानवता या विचारातून कार्य सुरू आहे. मनाचे विचार बदलण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून कार्य केले जाते. चांगले संकल्प केले तर मानव व मानवतेचे विचार येऊ लागतात. सत्याचा संकल्प आला तर मानवतेचे दया, शांती, प्रेम हे  विचार येऊ लागतात. हे विचार आले नाही तर समाजात हिंसा होते आणि हे समाजासाठी भयानक आहे. मन, मानव व मानवता हे सूत्रच बैठकीत दिले जाते. आभार प्रदर्शन रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

Exit mobile version