महाराष्ट्रभूषण पुरस्कार दुर्घटना

प्रशासनाच्या ढिसाळपणामुळेच मृत्यू;  लोकांचा संताप

 पनवेल | दीपक घरत |
 जेष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना  महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात उष्माघातामुळे 13 जणांचा बळी जाण्याची घटना ( रविवारी ता.16) घडली. यामध्ये रायगड जिल्ह्यातील तिघाजणंना समावेश आहे.  या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांकडून प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.  प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यानेच इतक्या मोठ्या संख्येन मृत्यू झाल्याचा आरोप  करण्यात येत आहे.राज्य शासनाच्या अट्टाहासाचे हे बळी असल्याची टीकाही राजकीय क्षेत्रातून होत आहे.तर सरकारने मात्र या घटनेचे राजकीय भांडवल करु नये सर्वांनी सरकारच्या मागे ठामपणे उभे रहावे,असे आवाहन केले आहे.
शासनाच्या वतीने दिलेल्या माहिती नुसार मृत्यू झालेल्या व्यक्तींचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याची माहिती देण्यात आली असली तरी घटनेप्रसंगी उपस्थितांकडून  दिलेल्या माहितीनुसार घटनेबाबत धक्कादायक वास्तव समोर येत आहे. पुरस्कार सोहळा संपन्न झाल्या नंतर कार्यक्रम स्थळातून बाहेर पडण्यासाठी  कार्यक्रमस्थळी उपस्थितांनी  एकाचवेळी एकाच मार्गांवरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याने झालेल्या ढकलाढकलीत काहीजण जखमी झाले असावेत,असा संशय आहे.

 मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे
 1) महेश नारायण गायकर (वय 42) वडाळा मुंबई (मूळ गाव म्हसळा मेहंदडी), जयश्री जगन्नाथ पाटील (वय 54),रा.म्हसळा रायगड, मंजुषा कृष्णा भोंबंडे (वय 51), गिरगाव मुंबई (मुळगाव श्रीवर्धन), स्वप्निल सदाशिव केणी (वय 30),शिरसाटबामन पाडा विरार,तुळशीराम भाऊ वांगड (वय 58),जव्हार पालघर, कलावती सिद्धराम वायचळ (वय 46),सोलापूर, भीमा कृष्णा साळवी  (वय 58), रा.कळवा ठाणे, सविता संजय पवार (वय 42) रा.मुंबई, पुष्पा मदन गायकर (वय 64),रा.कळवा ठाणे,वंदना जगन्नाथ पाटील (वय 62) रा.करंजाडे, मीनाक्षी मोहन मिस्त्री (वय 58),वसई पालघर,गुलाब पाटील, रा.विरार अशी मृतांची नावे आहेत.   दहा मृतदेह वारसाच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

शौैचालयामुळे कुचंबणा
याच   मैदानावर 2008 मध्ये  नानासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर  करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.  यावेळी उपस्थित श्रीसदस्यासाठी दर पंधरा मिनिटावर सार्वजनिक शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. रविवारी देखील कार्यक्रम स्थळी महिलांसाठी चार हजार आणि पुरुषांसाठी चार हजार शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती . मात्र तिथेपर्यत पोहचण्यासाठी जवळपास पाऊण तासाचा वेळ लागत होता. त्यामुळे कार्यक्रमस्थळी गर्दीतील अनेकांनी पाणी पिणे आणि खाणे टाळल्याने डीहायड्रेशनच्या त्रासाने अनेकांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वैद्यकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.

 व्हीव्हीआयपींसाठी वातानुकुलीत तंबू
कार्यक्रमात उपस्थित राहणार्‍या व्हीव्हीआयपी व्यक्ती आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी दोन ठिकाणी वातानुकुलीत तंबुंची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी उपस्थित व्यक्तींना आयोजकांकडून बाटलीबंद पाणी आणि सामोसे, ढोकळा तसेच मूग वडे असलेल्या अल्पोहाराची पाकीट पुरवण्याचे काम स्वयंसेवकांकरवी करण्यात येत होते. त्याच वेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित सामान्य श्रीसदस्यांना मात्र ग्लुकोज ची बिस्कीटे पुरवण्यात येत होती.

दुर्घटनेनंतर डॉक्टर अनुपस्थित
कार्यक्रमाला लाखो संख्येने श्री सदस्य उपस्थित राहतील ही शक्यता लक्षात घेत कार्यक्रमस्थळी तीनशे डॉक्टर उपस्थित असावेत अशी मागणी प्रशासनाकडे  केली होती मात्र दुर्घटना घडल्यानंतर कार्यक्रमस्थळी रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर उपस्थित नसल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. प्रशासनाने मात्र त्याचा इन्कार केला आहे.

आदल्या दिवशीही उडाला होता गोंधळ
खारघर येथील मैदानावर उपस्थित राहण्यासाठी कार्यक्रमाच्या दोन दिवस अगोदर पासूनच देशभरातून  लोक  पोहचत होते. त्यांची मैदानात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र जेवण करण्यासाठी गेलेले  आपल्यासोबतच नव्याने मैदानात दाखल होणार्‍यांना  देखील स्वतः बसलेल्या जागेवर घेऊन येत होते.  कार्यक्रम स्थळी उपस्थित बाउंसरनी  नव्याने येणार्‍यांंना रोखल्याने आदल्या दिवशीच कार्यक्रमस्थळी काही काळ  गोंधळ झाला होता.

Exit mobile version