मणिपूर संघाला हरवून महाराष्ट्र उपांत्य फेरीत

2-1 असा केला पराभव, प्रियांकाने नोंदवलेले दोन गोल

| पुणे | वृत्तसंस्था |

गतवेळच्या उपविजेत्या आणि यजमान महाराष्ट्र संघाने मणिपूरचा 2-1 असा पराभव करून महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलीगॉस मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या प्रियांका वानखेडेने नोंदवलेले दोन गोल निर्णायक ठरले. सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला मणिपूरच्या लिली चानू मायेंगबमने गोल केला.

गतविजेत्या मध्य प्रदेश संघाने बंगालचे आव्हान शूटआऊटमध्ये 4-3 असे परतवून लावले. नियोजित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटला होता. यावेळी बंगालकडून 30 व्या मिनिटाला मॅक्सिमा टोप्पोने गोल केला. तर मध्य प्रदेशकडून 45 व्या मिनिटाला ऐश्‍वर्या चव्हाणने गोल करून बरोबरी साधली. दिपीकाने केलेल्या दोन गोलच्या जोरावर हरियानाने ओडिशाचा 4-1 असा पराभव केला. नेहा गोयल, नवनीत कौर यांनी प्रत्येकी एक गोल केला.

ओडिशाचा एकमात्र गोल नेहा लाक्राने नोंदवला. दीपिका सोरेंग आणि संगीता कुमारीने केलेल्या गोलच्या जोरावर झारखंडने मिझोरामचे आव्हान 2-1 असे परतवून लावले. मिझोरामचा एकमात्र गोल लार्लेमसियामीने नोंदवला. या स्पर्धेत शुक्रवारी (दि.21) महाराष्ट्र विरुद्ध मध्य प्रदेश आणि हरियाना विरुद्ध झारखंड हे उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत.

Exit mobile version