नागोठण्याच्या रिलायन्स स्टेडियमवर सामन्याचे आयोजन
| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील रिलायन्स स्टेडियमच्या मैदानावर कूच बिहारी चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्ध ओडिशा या सामन्याला रंगत आली आहे. पहिल्या दोन दिवसांच्या खेळाच्या समाप्तीनंतर महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत सामन्यावर आपली पकड बनवली आहे. तसेच, महाराष्ट्राचा सलामीवीर फलंदाज जक्षन सिंह याने पहिल्या दिवशी 102 धावा ठोकत आपले शतक पूर्ण केले. तर, दुसऱ्या दिवशी अष्टपैलू खेळाडू सुवासिक जगताप याने 117 धावा ठोकल्या.
नागोठण्यातील रिलायन्स मैदानात महाराष्ट्र विरुद्ध ओडिशा कूच बिहार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील सामन्याला रंगत आली आहे. पहिल्या दोन दिवसांच्या खेळाच्या समाप्ती नंतर महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत सामन्यावर आपली पकड बनवली आहे. महाराष्ट्राचा तंत्रशुद्ध सलामीवीर फलंदाज जक्षन सिंह याने सामन्याच्या पहिल्या दिवशी धुवांधार फलंदाजी करत 13 चौकार व एका षटकाराच्या सहायाने 102 धावा ठोकत आपले शतक पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा मधल्या फळीतील अष्टपैलू खेळाडू सुवाशिक जगताप याने मैदानाच्या चौफेरी टोलेबाजी करत 117 धावा काढल्या. त्यामध्ये 13 चौकार व एका षटकारांचा समावेश होता. महाराष्ट्राने दुसऱ्या दिवशी सर्व गडी गमावत 149.3 षटकांमध्ये 528 धावांचा डोंगर उभा केला. ओडिशाकडून अर्पित मोहंती याने सर्वाधिक 5 तर राझ यादव व रुद्र मलिक यांनी प्रत्येकी 2 फलंदाजांना बाद केले.
त्यानंतर लक्षाचा पाठलाग करतातना ओडिशा संघाने सावध सुरुवात करत दिवसाअखेर 3 गडी गमावत 134 धावा फलकावर नोंदवल्या आहेत. त्यामध्ये स्वागत मिश्रा याने 42 व बिश्वजीत प्रधान नाबाद 28 धावांवर खेळत आहे. महाराष्ट्राच्या संघाकडून अर्कम सय्यद व अभिनंदन अडक यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. महाराष्ट्राच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक इंद्रजीत कामतेकर व संघ व्यवस्थापक राहुल अरवाडे यांनी खेळाडूंच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.
हा सामना पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या संघाचे माजी क्रिकेटपटू व मुख्य सिलेक्टर श्रीकांत काटे व निवड समितीचे सदस्य शिरीष कामथे उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, रिलायन्स नागोठणेचे मैदान अतिशय सुरेख आहे. तसेच, येथील खेळपट्टी फलंदाजी व गोलंदाजी दोन्ही साठी अनुकूल असणार आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार पासून पडून सुध्दा अतिशय कमी वेळात मैदान तयार केले. रिलायन्स हॉर्टिकल्चर विभागाचे प्रमुख शरद पवार मैदानाचे कंत्राटदार संतोष कोठे,ग्राऊंड्समन कुमार पिंगळस्कर व संदेश पाटील यांनी अतिशय मेहनत करून सुरेख खेळपट्टी तयार केली आहे. खेळपट्टीवर फलंदाजांनी संयम व तंत्रशुद्ध पद्धतीने फलंदाजी केल्यास मोठी धावसंख्या केली जाऊ शकते. तसेच, गोलंदाजांना सुध्दा खेळपट्टी साथ देणारी ठरेल. कूच बिहार ट्रॉफी सामन्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन व रिलायन्स नागोठाणे विभागाचे त्यांनी आभार मानले आहेत. येणाऱ्या क्रिकेट हंगामात बीसीसीआय तसेच महाराष्ट्राच्या आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धा याच मैदानावर घ्याव्यात, अशी मागणी एमसीएकडे करणार असल्याचे देखील श्रीकांत काटे यांनी सांगितले.
