100 मीटर शर्यतीत महाराष्ट्राची हुकुमत

गायत्री, रिंकीला रौप्यपदक

| जयपूर | वृत्तसंस्था
|

खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत महाराष्ट्राची विजयी घोडदौड थलेटिक्स ट्रॅकवरही झळकली. लक्षवेधी 100 मीटर धावणे शर्यतीत सुवर्ण, रौप्यसह कांस्यपदकावर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी नाव कोरले. 20 मीटर चालणे शर्यतीत गायत्री चौधरीने तर 5000 मीटर धावणे शर्यतीत आदिवासी पाड्यावरील रिंकी पवाराने रूपेरी धाव घेत दिवस गाजविला. सवाई मानसिंग क्रीडा संकुलातील थलेटिक्स ट्रॅकवर वेगवान धावपटू होण्याचा मान शिवाजी विद्यापीठाच्या ऋषी प्रताप देसाईने संपादन केला. 10.53 सेकंदाची वेळ नोंदवून कोल्हापूरच्या ऋषीने बाजी मारली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लौकिक मेलगे 10.59 सेकंदाची चेळ देत रौप्यपदकाचा मानकार ठरला. मुंबईच्या सौमया विद्याविहार विद्यापीठाच्या जय भोईरने 10.86 सेकंदात शर्यत पूर्ण करीत कांस्यपदकावर नाव कोरले.
शासनाच्या संभाजीनगरमधील क्रीडा प्रबोधिनीत सराव करणाऱ्या ऋषी प्रताप देसाईने पर्दापणातच पदकाचा करिश्मा घडविला आहे. जागतिक विद्यापीठ स्पर्धेत पदक जिंकण्याचे ध्येय असणारा ऋषीचे वडिल शेतकरी आहेत. रौप्यपदक विजेता लौकिकचे वडिल अनंत मेलगे हे रिक्षा चालक आहेत. पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीत अरविंद चव्हाण यांचे मार्गदर्शन त्याला मिळत आहे. मुंबईत सराव करणारा जय भोईरचे खेलो इंडिया स्पर्धेतील हे पहिलेच पदक आहे.
5000 मीटर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रिंकी पवाराने खेलो पदकाची हॅटट्रिक पूर्ण केली. रवींद्रनाथ टागोर विद्यापीठाच्या बुशरा खानने सुवर्णपदक पटकावले. रिंकी पवाराने उत्तरप्रदेश स्पर्धेत कांस्य, गत आसाम स्पर्धेत रौप्यपदक पटकवले होते. जयपूरमध्ये 18:20.52 मि. वेळ नोंदवून तिने सलग दुसऱ्या वर्षी रूपेरी कामगिरीचे प्रदर्शन घडवले. मूळची नंदूरबार येथील रिंकी नाशिकमध्ये सराव करीत असून विश्व विद्यापीठ स्पर्धेत तीने देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

Exit mobile version