| पनवेल | वार्ताहर |
राज्याच्या उद्योग विभागाच्या वतीने कळंबोलीमध्ये सहा एकर भूखंडावर आधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी एक हजार 700 कोटी रुपयांची मंजुरी राज्य सरकारने दिली आहे. या ठिकाणी पंचतारांकित हॉटेलसुद्धा साकारण्यात येणार आहे. यामुळे कळंबोलीसह पनवेल परिसराला एक वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे. या केंद्राच्या निविदा मागील महिन्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्याला कौशल्ययुक्त कामगार उपलब्ध होणार आहेत.
महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक होत आहे. तसेच राज्यातील वेगवेगळ्या एमआयडीसीमध्ये अनेक कारखाने येत आहेत. औद्योगिकदृष्ट्या प्रगतिपथावर असणार्या महाराष्ट्रामध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कळंबोलीमध्ये मोठे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. तीन वर्षांमध्ये हे काम पूर्णत्वास येणार आहे. सायन-पनवेल महामार्ग, यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत 480 क्रमांकाचा भूखंड आहे. राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान साहाय्यभूत सेवा धोरणातून हा उपक्रम राबविला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शिखर संस्था उभारण्याचे काम एमआयडीसी करत आहे.
इन्क्युबेशन सेंटर इमारत उद्योग प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रकल्पाअंतर्गत इनक्युबेशन सेंटरच्या इमारतीचे क्षेत्रफळ 39,160.76 चौरस मीटर आहे. तसेच या केंद्रात प्रशिक्षणार्थ्यांसाठी 13,269.38 चौरस मीटरच्या जागेवर निवासी इमारत बांधण्यात येणार आहे. या केंद्रात 26,385.09 चौरस मीटर जागेवर माहिती व तंत्रज्ञान साहाय्यभूत सुविधेची इमारत उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची अंदाजपत्रकीय रक्कम 1,059.41 कोटी असून वस्तू व सेवा कर तसेच इतर खर्चांसहीत या प्रकल्पासाठी एक हजार 700 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र हब उद्योग प्रशिक्षण केंद्रात राज्यातील अग्रगण्य तांत्रिक संस्था, बिझनेस स्कूल आणि खासगी संस्था यांच्या सहाकार्याने स्टार्टअपला सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र हब विकसित करण्यात येणार आहे. एम-हब हे उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शिखर संस्था म्हणूनही काम करणार आहे.
300 विद्यार्थ्यांची प्रशिक्षण क्षमता उद्योग प्रशिक्षण केंद्राची अत्याधुनिक इमारत असेल, ज्यामध्ये 300 विद्यार्थ्यांकरिता प्रशिक्षण सुविधा असणार आहे. तसेच त्यामध्ये विद्यार्थी तसेच कर्मचार्यांसाठी निवासाची व्यवस्था असणार आहे. स्टार्टअप्सना उत्तम तंत्रज्ञान, गुणवत्ता, व्यवसाय नेटवर्क आणि निधी मिळविण्याकरिता मदत करणे, हे या केंद्राचे उद्दिष्ट असणार आहे.