| पणजी | वृत्तसंस्था|
गोव्यात सुरू झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटनमध्ये सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या अंतिम सामन्यात कर्नाटकने सुवर्णपदक जिंकताना महाराष्ट्राचा 3-1 असा पराभव केला. महिलांच्या अंतिम सामन्यात आसामने महाराष्ट्राला 3-0 असे नमवले.पुरुष अंतिम लढतीत कर्नाटकच्या एस. भार्गव याने हर्षील दाणी याला तासभर चाललेल्या चुरशीच्या लढतीत 18-21, 21-19, 21-15 असे नमवून कर्नाटकला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या एकेरीत रोहन गुरबानी याने पृथ्वी रॉय याची झुंज 48 मिनिटांत मोडून काढताना 23-21, 22-24, 21-14 असे नमवून महाराष्ट्राला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.दुहेरीत कर्नाटकच्या जोडीची सरशी झाली. एच. व्ही. नितीन व के. साई प्रतीक जोडीने महाराष्ट्राच्या दीप रंभिया व अक्षण शेट्टी जोडीला 21-12, 21-14 असे नमवून कर्नाटकला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. अंतिम लढतीतील तिसऱ्या एकेरीत आयुष शेट्टी याने दर्शन पुजारी याला 21-16, 21-17 असे 36 मिनिटांत नमवले.
महिलांच्या अंतिम सामन्यात आसामने महाराष्ट्राचा 3-0 असा पराभव केला. अंतिम लढतीत अश्मिता चलिहा हिने आसामला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. तिने महाराष्ट्राच्या पूर्वा बर्वे हिला 21-16, 21-11 असे 33 मिनिटांत नमवले.दुसऱ्या एकेरीत ईशारानी बरुआ हिने आलिशा नाईक हिला पहिला गेम गमावल्यानंतर 40 मिनिटांत 9-21, 21-13, 21-18 असे पराजित केले. 2-0 या आघाडीनंतर दुहेरीत बाजी मारत आसामने सुवर्णपदक निश्चित केले. दुहेरीत ईशारानी व अश्मिता जोडीने सिमरन सिंघी व रितिका ठाकर जोडीला 21-19, 21-13 असे नमवून आसामच्या स्पर्धेतील पहिल्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राला रौप्यपदकावर समाधान
