आजपासून सातार्‍यात ‘महाराष्ट्र केसरी’

कुस्ती शौकिनांची उत्सुकता शिगेला
। कराड । वृत्तसंस्था ।
प्रतिष्ठेच्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला मंगळवारपासून सातार्‍यात प्रारंभ होणार असून, कुस्ती शौकिनांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच ‘महाराष्ट्र केसरी’च्या गदेसाठी शनिवारी (9 एप्रिल) अंतिम लढत खेळवली जाणार आहे.
राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे 64वी वरिष्ठ गट गादी आणि माती राज्य अजिंक्यपद कुस्ती, तसेच ‘महाराष्ट्र केसरी’ किताब लढत अशी एकंदरीतील भव्य स्पर्धा 5 ते 9 एप्रिल या कालावधीमध्ये सातार्‍याच्या श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात भरणार आहे. ‘महाराष्ट्र केसरी’साठी सातारा सज्ज झाले असून, जिल्हा क्रीडा संकुलात हलगी कडाडणार असल्याने कुस्ती शौकिनांमध्ये त्याची उत्कंठता शिगेला पोहोचली आहे.
मंगळवारी पंचांचे आगमन, उजळणी वर्ग, शहर, जिल्हा संघांचे आगमन, कुस्तीगीरांची वैद्यकीय तपासणी आणि वजने केली जातील. बुधवारी 57 ते 92 किलो वजन गटातील स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होईल. त्यानंतर 61, 86 आणि महाराष्ट्र केसरी गादी व माती विभाग कुस्तीगीरांचे वजन विभागातील कुस्तीगीरांचे वजन मोजमाप, वैद्याकीय तपासणी होणार असून, सायंकाळी 4 पासून स्पर्धेला सुरुवात होईल. गुरुवारी 61, 86 किलो वजनी गटातील विजेत्यांचे बक्षीस वितरण होईल. त्यानंतर 74 आणि 97 किलो वजनी गटातील सायंकाळी 4 वाजता स्पर्धा रंगणार आहे. शुक्रवारी या वजनी गटातील विजेत्यांना बक्षिसे दिल्यावर शनिवारी सायंकाळी महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी लढत होईल. यावेळी नामांकित मल्ल आणि कुस्ती शौकिनांची उपस्थिती अपेक्षित असेल. कुस्ती स्पर्धा सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांत होणार आहेत.

Exit mobile version