| मुंबई | दिलीप जाधव |
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना रविवारी (दि. 10) महाविकास आघाडीकडून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्याला ’महाराष्ट्रनामा’ असे नाव देण्यात आले आहे. मल्लिकार्जुन खरगे आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मविआचा महाराष्ट्रनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात शेतकरी, महिला, तरुण आणि आरोग्य क्षेत्राच्यादृष्टीने महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासनांची लयलूट करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहीरनाम्याचे मुंबईतल्या ट्रायडंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाशन करण्यात आले. मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात काय कामे करणार व पाच वर्षांत काय काम करणार हे या जाहीरनाम्यात सविस्तर मांडण्यात आले आहे. या महाराष्ट्रनामामध्ये महिलांना वर्षाला 6 सिलेंडर 500 रुपयात दिले जातील, महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शक्ती कायदा आणला जाईल. 300 युनिटपर्यंत वीजवापर असणार्या ग्राहकांना 100 युनिट मोफत वीज, नवीन औद्योगिक धोरणात रोजगारनिर्मितीवर भर असेल. सरकारच्या विविध विभागातील रिक्त 2.5 लाख जागा भरल्या जातील. एमपीएससीच्या माध्यमातून नोकर भरती केली जाईल. सरकारी नोकर्यातील कंत्राटी भरती पद्धत बंद करणार, सरकारी विभागातील जागांचा अनुषेश भरून काढणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक ठरवून निवडणुका घेतल्या जातील. महाराष्ट्राच्या विकासासाठी कृषी, ग्रामविकास, उद्योग, रोजगार, शहरी विकास, जनकल्याण यावर आधारित आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारकाचे काम पूर्ण करू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडॉर बनवला जाईल. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचे सरकार स्थापन करु तसेच 2030 पर्यंत समृद्ध महाराष्ट्र बनवण्याचा संकल्प या जाहीरनाम्यातून केला आहे.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक मुंबईकडे आर्थिकदृष्ट्या, रोजगारासाठी, उत्पादन, गुंतवणुकीच्या दृष्टीने अपेक्षेने पाहतात. देशभरातून लोक मुंबईत स्वप्न घेऊन येतात व मुंबई त्यांना सामावून घेते, त्यांच्या स्वप्नांचा बळ देते. सामाजिक बदलातही महाराष्ट्र आघाडीवर असतो. महाराष्ट्राची निवडणूक फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशाचे भविष्य बदलणारी निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी शेतकरी, तरुण, महिलांसाठी हे सरकार घालवणे गरजेचे आहे. भाजपा युतीचे खोके सरकार सत्तेतून खाली खेचून महाविकास आघाडीचे आणा, असे आवाहन खर्गे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचा समाचार घेत मल्लिकार्जून खर्गे पुढे म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेस सरकार महिलांना महालक्ष्मी योजनेतून 2 हजारे रुपये देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची खिल्ली उडवली आणि आता त्यांचेच सरकार महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेतून 1500 रुपये देत आहेत. काँग्रेसच्या योजनेची नक्कल भाजपाने केली आहे. राहुल गांधी यांनी संविधानाचे लाल रंगाचे पुस्तक दाखवले तर त्याला शहरी नक्षलवाद म्हणून टीका करत आहेत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लाल रंगाचे संविधान दिल्याचा फोटो दाखवून खर्गे यांनी भाजपा व नरेंद्र मोदी यांच्या टीकेतील हवा काढून घेतली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, भाजपा युती सरकारला दीड वर्षात शेतकर्यांची आठवण आली नाही, पण आता त्यांना शेतकर्यांची आठवण आली असून, कर्जमाफी करण्याच्या वल्गना करु लागले आहेत. महागाई, बेरोजगारी, महिला, शेतकरी दिसले नाहीत, आता त्यांना पराभव दिसत असल्याने त्यांना यांची आठवण झाली आहे. आता भाजपा युती सरकार खाली खेचण्याची वेळ आली असून, महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने परिवर्तन करण्याचा मानस बनवला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र कधी कोणाचा गुलाम बनला नाही व बनणार नाही, हा जाहीरनामा महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारा आहे. ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ म्हणणारे नरेंद्र मोदी जोपर्यंत महाराष्ट्रात येत राहतील, तोपर्यंत महाराष्ट्र अनसेफ राहील, असे संजय राऊत म्हणाले. जाहीरनामा समितीच्या सदस्य खा. वंदना चव्हाण यांनी मविआच्या जाहीरनाम्याबद्दलची सविस्तर माहिती दिली. तर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी आभार व्यक्त केले.
महाविकास आघाडीचा जाहीरनामा नरिमन पाईंट येथील हॉटेल ट्रायडंटमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या प्रमुख उपस्थिती मविआतील सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, खासदार अभिषेक मनु सिंघवी, एआयसीसीच्या मीडिया विभागाचे चेअरमन प्रवीण खेरा, सचिव बी.एम. संदीप, वॉर रुम प्रभारी वामशी रेड्डी, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य खा. डॉ. नासीर हुसेन, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.
जाहीरनाम्यात काय काय?
-शेतकर्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणार्यास 50 हजारांची सूट
-आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा आम्ही हटवणार जाती जनगणना करणार
-300 युनिट वीज वापरणार्यांना 100 युनिट वीज मोफत
-दोन लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार
-महिला, लहान मुले-मुलींसाठी ‘निर्भय महाराष्ट्र’ धोरण आखणार
-‘शक्ती’ कायद्याची अंमलबजावणी करणार
-2.5 लाख नोकरभरती करणार
-शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती
-शेतमालाला हमीभाव देणार, पीकविम्याच्या जाचक अटी काढणार
-सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा 4 हजार मानधन
-अडीच लाख सरकारी नोकर्यांची भरती सुरु करणार
-बार्टी, महाज्योती, सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार
-एमपीएससी परीक्षांचे निकाल 45 दिवसांत लावणार
-महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार
-महायुती सरकारचे पक्षपाती अध्यादेश रद्द करणार
-महायुती सरकारने खासगी व्यक्तींना दिलेल्या भूखंडांवर फेरविचार करु
-शहरीकरणाला दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयोग स्थापन करणार
-सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बनवणार
महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह इंडस्ट्री स्थापन करणार
-बिनाव्याज पाच लाख कर्ज देणार
-कंत्राटी नोकरभरती बंद करणार
-महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार
-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार, या निवडणुका एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेणार
-सरकारी कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
-शिवभोजन थाळी योजना केंद्रांची संख्या वाढविणार
-जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलणार
-वीजग्राहकांचा विरोध लक्षात घेऊन प्रीपेड मीटर्स योजनेचा आढावा घेणार
-युवकांच्या कल्याणासाठी ‘युवा आयोगा’ची स्थापना करणार
पहिल्या 100 दिवसांत काय करणार?
महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार
महिलांचा बस प्रवास मोफत करणार
सहा घरगुती गॅस सिलिंडर 500 रुपयांत देणार
महिला कर्मचार्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार
जन्मास आलेल्या प्रत्येक मुलीस 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर 1 लाख रुपये देणार