कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ जाहीर

अहमदनगरच्या शंकर गदईकडे संघाचे नेतृत्व
| मुंबई | प्रतिनिधी |

हरियाणा चरखी येथे दि. 21 ते 24 जुलै या कालावधीत होणार्‍या 69व्या वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आपला अंतिम संघ जाहीर केला. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पहिल्यांदाच विजेतेपद मिळविणार्‍या अहमदनगर संघाचा संघनायक शंकर गदई याच्या गळ्यात संघाच्या नेतृत्वपदाची माळ पडली.

या संघात अहमदनगर, मुंबई शहर, ठाणे या जिल्ह्यांचे दोन-दोन खेळाडू असून मुंबई उपनगर, नाशिक, रत्नागिरी, नांदेड, रायगड, धुळे यांचा एक-एक खेळाडू आहे. रायगडच्या मयूर कदमकडे गतवर्षाच्या एका राष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव पाठीशी आहे. इतर अकरा खेळाडू अगदी नवखे आहेत. प्रशिक्षक प्रशांत चव्हाण याला वीस वर्षांपेक्षा अधिक काळ कबड्डी खेळाचा अनुभव आहे. हा निवडण्यात आलेला संघ अहमदनगर येथे मॅटवर सराव करीत आहे. हा संघ मंगळवार, दि.19 जुलै 2022रोजी दुपारी मुंबईतील वांद्रे टर्मिनन्स येतून गरीब रथ रेल्वेने स्पर्धेकरिता रवाना होईल, अशी माहिती राज्य संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांनी सर्व प्रसार माध्यमाना दिली.

पुरुष वरिष्ठ गट संघ :- शंकर गदई-संघनायक, राहुल खाटीक (दोन्ही अहमदनगर), अक्षय उगाडे, सिद्धेश पिंगळे (दोन्ही मुंबई शहर), अक्रम शेख (मुंबई उपनगर), अस्लम इनामदार, अक्षय भोईर (दोन्ही ठाणे), आकाश शिंदे (नाशिक), शेखर तटकरे (रत्नागिरी), किरण मगर (नांदेड), मयूर कदम (रायगड), देवेंद्र कदम (धुळे). प्रशिक्षक :- प्रशांत चव्हाण (ठाणे), व्यस्थापक :- आयुब पठाण (नांदेड), फिजिओ ट्रेनर :- पुरुषोत्तम प्रभू.

Exit mobile version