| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात 161 (56, 55, 50) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राने तिसर्यांदा या स्पर्धेत विजेतेद पटकावले. यापूर्वी 2019 पुणे आणि 2020 आसाम येथेही महाराष्ट्र विजेते ठरले होते. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी तीन सुवर्ण आणि प्रत्येकी एका रौप्य, तसेच ब्राँझपदकाची कमाई केली. कुस्तीत नरसिंग पाटील ब्राँझपदकाचा मानकरी ठरला.
स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी अपेक्षाने 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत 33.92 सेकंदात जिंकली. मुलांच्या 50 मीटर फ्री-स्टाईल शर्यतीत जयवीर मोटवानीने 24.32 सेकंद वेळ देत सोनेरी कामगिरी केली. याच स्पर्धा प्रकारात अर्जुनवीर गुप्ता रौप्यपदकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राला आजचे आणि स्पर्धेतील अखेरचे सुवर्णपदक 4 बाय 100 मीटर फ्री-स्टाईल रिले शर्यतीत मुलांनी मिळवून दिले. या संघात ऋषभ दास, अर्जुनवीर गुप्ता, शुभंकर पत्की, वेदांत माधवन यांचा समावेश होता. त्यांनी 3 मिनिट 37.65 सेकंद अशी वेळ दिली. मुलींच्या 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात धृती अग्रवाल तिसरी आली. तिने 2 मिनिटे 28.67 सेकंद अशी वेळ दिली.
कुस्तीत नरसिंगला ब्राँझ
कोल्हापूरच्या नरसिंग पाटील याने फ्री स्टाईल विभागातील 55 किलो गटात यश संपादन केले. त्याने राजस्थानच्या अनुज कुमार याच्यावर शानदार विजय मिळविला. नरसिंग हा बेळगाव येथील आर्मी बॉईज इन्स्टिट्यूटमध्ये सराव करीत आहे. दरम्यान, महाराष्ट्राला कुस्तीमध्ये यंदा येथे दोन सुवर्ण, तीन रौप्य व तीन कांस्यपदकांची कमाई झाली.
वीस क्रीडा प्रकारात पदक
महाराष्ट्राने स्पर्धेत 22 क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता. यापैकी वीस क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने किमान एक तरी पदक कमावले. केवळ कलरीपटायु आणि गतका या दोन खेळात महाराष्ट्र पदक मिळवू शकला नाही.
महाराष्ट्राची शान उंचावली- देओल
महाराष्ट्राने खेलो इंडिया स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकून अतिशय भूषणावह कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळे महाराष्ट्राची शान उंचावली आहे आणि महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंच्या पुढे त्यांची ही कामगिरी आदर्श ठरली आहे असे राज्याच्या क्रीडा व युवक खात्याचे सचिव श्री रणजीत सिंह देओल यांनी सांगितले.
आमच्या खेळाडूंनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावीत महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला आहे. खेळाडूंच्या या कामगिरीने मी अतिशय भारावून गेलो आहे. महाराष्ट्राचे हे यशस्वी खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमक दाखवतील आणि ऑलिंपिक सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतही महाराष्ट्राची पताका उंचावतील.
डॉ. सुहास दिवसे, क्रीडा आयुक्त, महाराष्ट्र