राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल

3 सुवर्ण, 5 रौप्य, 4 कांस्य पदकाची कमाई

| पणजी | वृत्तसंस्था |

गोवा येथे सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राकडून वेटलिफ्टिंग आणि जिम्नॅस्टिक्सपटूंची पदक कमाई केली. वेटलिफ्टिंगमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके मिळवली. तर, जिम्नॅस्टिक्स क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण आणि दोन कांस्य अशी एकूण चार पदके पटकावली. महाराष्ट्राने तीन सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य अशी एकूण 12 पदके मिळवून पदकतालिकेत अव्वल स्थान राखले आहे. सेनादल दुसऱ्या स्थानावर आहे.

दिपाली गुरसाळेने गोवा येथे सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बुधवारी दोन नव्या राष्ट्रीय विक्रमांसह वेटलिफ्टिंगमधील सुवर्णपदक पटकावले. याचप्रमाणे मुकुंद आहेरने रौप्य आणि शुभम तोडकरने कांस्य पदक प्राप्त केले. कॅम्पल मैदानावर सुरू असलेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने तीन पदकांची कमाई केली. महिलांच्या 45 किलो वजनी गटात दीपाली गुरसाळेने स्नॅचमध्ये 75 किलो तसेच क्लीन अँड जर्कमध्ये 90 किलो असे एकूण 165 किलो वजन उचलले. यातील स्नॅच 75 किलो आणि एकूण वजन 165 किलो असे दोन राष्ट्रीय विक्रम तिने नोंदवले. पश्चिम बंगालच्या चंद्रिका तरफदारीने एकूण 162 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवले. चंद्रिकाने क्लीन अँड जर्कमध्ये 95 किलो वजनासह राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तर तेलंगणाच्या टी प्रिय दर्शिनीने (161 किलो) कांस्य पदक मिळवले. महाराष्ट्राची आणखी एक स्पर्धक सारिका शिंगरेला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

पुरुषांच्या 55 किलो गटात आहेरने स्नॅचमध्ये 112 किलो तसेच क्लीन अँड जर्कमध्ये 137 किलो असे एकूण 249 किलो वजन उचलले. या गटात सेनादलाच्या प्रशांत कोळीने सुवर्णपदकावर नाव कोरले. प्रशांतने स्नॅचमध्ये 115 किलो आणि एकूण 253 किलो वजन उचलून दोन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. 230 किलो वजन उचलणाऱ्या आंध्र प्रदेशच्या एस गुरू नायडूला कांस्यपदक मिळाले. पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात शुभम तोडकरने 263 किलो वजन उचलून कांस्य पदक संपादन केले. त्याने स्नॅचमध्ये 115 किलो तसेच क्लीन अँड जर्कमध्ये 148 किलो वजन उचलले. सेनादलाच्या चारू पेसीने 267 किलोसह सुवर्ण आणि सिद्धांत गोगोईने 266 किलोसह रौप्य पदक मिळवले.

Exit mobile version