महाराष्ट्राला मिळणार 11 हजार नवे पोलीस

। अलिबाग । प्रतिनिधी ।

राज्यात नुकतीच पोलीस भरती प्रक्रिया पार पडली. पोलीस शिपाईपासून चालक, बॅन्ड्समन अशा अनेक पदांची मैदानी चाचणी व लेखी परीक्षा घेण्यात आली. या भरती प्रक्रियेतून अकरा हजार 956 उमेदवरांची निवड झाली असून, त्यांना सप्टेंबर महिन्यात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस दलाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात नवे पोलीस मिळणार आहेत.

2022-23 या वर्षातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली होती. पोलीस शिपाई नऊ हजार 595, चालक एक हजार 686, बॅन्ड्समन 41 अशा पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडली. सुरुवातीला मैदानी चाचणी झाली. या चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षादेखील घेण्यात आली.
17 हजार रिक्त पदांपैकी 11 हजार 956 पदांची निवड करण्यात आली आहे. त्यांना नियुक्ती पत्रे देण्याचे काम सुरु आहे. निवडपात्र उमेदवार जिल्हा मुख्यालयात लवकरच कर्तव्यासाठी हजर होतील. या निवड झालेल्या उमेदवारांमध्ये खुल्या प्रवर्गातील दोन हजार 890, आर्थिक दुर्बल घटकातील एख हजार 132, एसईबीसी वर्गातील एक हजार 97, इतर मागास वर्गातील दोन हजार 542, विशेष मागास प्रवर्गातील 293, भटक्या जमातीमधील एक हजार 24, विमुक्त जातीमधील 344, अनुसूचित जमातीमधील एक हजार 98 व अनुसूचित जातीमधील एक हजार 539 आदींचा समावेश आहे. निवडपात्र उमेदवारांना सप्टेंबर अखेरपर्यंत मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version