ठाकरे यांनी मोदी, शहांवर डागली तोफ
| पुणे | प्रतिनिधी |
महाराष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिले, ते हुतात्मे महाराष्ट्राची होणारी लूट आणि पायदळी तुडविली जात असलेली अस्मिता पाहत आहेत. कोणासाठी बलिदान दिले, असे त्यांना वाटत असेल. त्यामुळे प्राण गेला तरी चालेल, हुकूमशहांच्या ताब्यात महाराष्ट्र जाऊ देणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मंगळवारी तोफ डागली. संयुक्त महाराष्ट्र समिती फोडण्याचे काम जनसंघाने केल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ही सभा होत आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले, ‘स्वातंत्र्यलढ्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र लढ्यात तेव्हाचा जनसंघ सहभागी झाला नव्हता. माझे आजोबा आणि वडील अग्रभागी होते. जनसंघ संयुक्त समितीत सामील झाला, परंतु जेव्हा निवडणूक लढवायची वेळ आली, तेव्हा समिती फोडण्याचे पाप या जनसंघाने केले होते. भाजपने कायमच महाराष्ट्रावर अन्याय केला. त्यामुळे मी शपथ घेऊ सांगतो, महाराष्ट्रासाठी ज्यांनी मर्दासारख्या गोळ्या छातीवर घेतल्या, तो महाराष्ट्र हुकूमशाहांच्या कचाट्यात जाऊ देणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी पवार यांचे नाव न घेता भटकती आत्मा, असा उल्लेख केला होता. त्यावर ठाकरे म्हणाले, भटकती आत्मा आहे, तशी एक वखवखलेली आत्मादेखील आहे. जी महाराष्ट्रात सगळीकडे फिरून सभा घेत आहे. ती आत्मा स्वत:साठी आणि मित्रांसाठी लढत आहे. त्यांनी जरा शेतकर्यांकडेही बघावे. आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या घराकडे आणि त्यांच्या पत्नीच्या तुटलेल्या मंगळसूत्राकडे बघावे. महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे, पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर, शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि मावळचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ वारजे येथे आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, सहसंपर्क प्रमुख सचिन अहिर आदी उपस्थित होते.