40 प्लस कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र विजयी

। नेरळ । वार्ताहर ।
केरळ राज्यात चौथ्या मास्तर गेम्सचे आयोजन केले होते.त्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि पुरुष या दोन्ही संघांनी विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र पुरुष संघाने सलग दुसर्‍यांदा विजेतेपद पटकावले.
चौथी मास्टर गेम्स स्पर्धाकेरळ राज्याची राजधानी असलेल्या स्पर्धा त्रिवेंद्रम येथे 18 ते 22 मे रोजी पार पडल्या. स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून कबड्डीचे तीन संघ सहभागी झाले होते. 40 प्लस गटात महाराष्ट्र राज्याच्या पुरुष आणि महिला संघाने अंतिम विजेतेपद मिळवून सुवर्णपदक मिळविले. महाराष्ट्र 40 प्लस कबड्डी पुरुष संघाचे नेतृत्व रायगड जिल्ह्यातील माजी खेळडू नेरळ येथील अनिल जैन हे करीत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघाने अंतिम विजेतेपद पटकावले. अनिल जैन यांच्यासह महाराष्ट्र संघात विनायक गायकवाड, अरुण इंगोळे, आनंद वारघे, देवदत्त शेळके, योगेश पाटील, आल्हाद तर्हाड, दत्ता भोईर, गोवर्धन राठोड, सुरेंद्र तावडे, भाऊ तावडे, सुनिल सावंत, विनोद पवार यांनी पुन्हा एकदा सरस कामगिरी करुन दुसर्यांदा सुवर्ण पदक मिळवले.
सुप्रिया सावंत यांच्या नेतृत्वाखाली खेळात असलेल्या महिला 40 प्लस संघाने देखील यावर्षी विजेतेपद पटकावले. गतवर्षी महिला संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. सुप्रिया सावंत यांच्या संघात अनिता कुळकर्णी, लता शर्मा, मंगल दळवी, निलोफर शेख, शिल्पा खंडारे, पौर्णिमा राणे, स्मिता जाधव, अनामिका म्हाञे, लिना डोलकर ,संपदा काजोलकर, गोदावरी वराढे, निता जाधव यांचा समावेश होता. राष्ट्रीय 40 प्लस मास्टर्स स्पर्धेत ज्येष्ठ कबड्डीपट्टू महाराष्ट्र संघ दुर्वास धुळे, सुनील जाधव, खंडू धुळे, संजय डबरे, देविदास ठाणगे, भालचंद्र पिसाळ, दीपक मुठे आणि रवी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेत सहभागी झाला होता.
मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद मिळविणार्‍या महाराष्ट्र संघाचा कर्णधार अनिल जैन हे स्पर्धा जिंकून नेरळमध्ये आले असता नेरळ ग्रामस्थ तसेच जैन सकल संघ यांनी त्यांची नेरळ गावाच्या वेशीवरून मिरवणूक काढली. नेरळ बाजारपेठ येथे बँडच्या तालावर निघालेल्या मिरवणुकीत नेरळ गावातील असंख्य लोक सहभागी झाले होते.

Exit mobile version