| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे नांदेड येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय शालेय नेटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने विजेतेपद पटकावले. छत्रपती संभाजीनगरच्या जिज्ञासा चौहान हिने 17 वर्षांखालील मुलींच्या गटात तर विरोचन शिंदे याने 14 वर्षांखालील मुलांच्या गटात उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत विजयात मोलाचा वाटा उचलला. नांदेड येथे गुरू गोविंदसिंग क्रीडांगणावर 27 ते 31 जानेवारीदरम्यान 14 वर्षांखालील मुले व मुली तसेच 17 वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. तिन्ही गटात महाराष्ट्राने विजेतेपद पटकावले.
अध्यक्ष सतीश इंगळे, जयकुमार टेंभरे, प्रीती सोपनीस, लक्ष्मण दातीर, प्रवीण कुपटीकर यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना सुवर्णपदक, प्रमाणपत्र आणि विजेतेपदाचा करंडक देण्यात आला. मुलांच्या गटात उत्कृष्ट कामगिरी करणारा विरोचन शिंदे हा पद्मश्री शंकरबापू आपेगावकर शाळेचा विद्यार्थी आहे. समृद्धी भोसेकर, पवनकुमार कछोट, विश्वास पाटील, हर्ष मगरे, आकाश सरदार, अभिजित देशमुख, गजानन दीक्षित यांनी त्याचे अभिनंदन केले.







