हजारे करंडक स्पर्धेत महाराष्ट्राचे आव्हान कायम

। राजकोट । वृत्तसंस्था ।
अंकित बावणेच्या नाबाद 113 धावांच्या देदीप्यमान खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने रविवारी झालेल्या विजय हजारे करंडकातील ङ्गडफ गटातील लढतीत उत्तराखंडवर चार विकेट्स व एक चेंडू राखून विजय मिळवला आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील आव्हान कायम राखले. महाराष्ट्राने या गटामधून आतापर्यंत चारपैकी तीन सामन्यांमधून विजय संपादन करीत 12 गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले आहे. या गटामध्ये केरळ व मध्य प्रदेश हे प्रत्येकी 12 गुणांसह सरस नेट रनरेटच्या जोरावर अनुक्रमे पहिल्या व दुसर्‍या स्थानावर विराजमान आहेत.
उत्तराखंडकडून महाराष्ट्रासमोर 252 धावांचे आव्हान उभे ठाकले. पहिल्या तीन लढतींत शतक ठोकणारा कर्णधार ॠतुराज गायकवाड या लढतीत यशस्वी ठरला नाही. तो 21 धावांवरच बाद झाला. यश नाहर (21 धावा), राहुल त्रिपाठी (12 धावा) यांनाही मोठी खेळी करता आली नाही. याप्रसंगी अनुभवी अंकित बावणे महाराष्ट्राच्या मदतीला धावून आला. त्याने 132 चेंडूंत 12 दमदार चौकार व एक गगनभेदी षटकारासह नाबाद 113 धावांची मौल्यवान खेळी साकारत महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
नौशाद शेखने 47 धावांची व जगदीश झोपेने 22 धावांची खेळी करीत अंकित बावणेला उत्तम साथ दिली. उत्तराखंडकडून स्वप्नील सिंग व हिमांशू बिश्त यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. जगदीश, अझीमची प्रभावी गोलंदाजी महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तनुश गुसेनने 55 धावांची, रॉबीन बिस्तने 39 धावांची, स्वप्नील सिंगने 66 धावांची, वैभव भट्टने नाबाद 51 धावांची आणि हिमांशू बिश्तने नाबाद 21 धावांची खेळी केली; पण जगदीश झोपे व अझीम काझी या महाराष्ट्राच्या डावखुर्‍या गोलंदाजांनी उत्तराखंडच्या फलंदाजांना बांधून ठेवले. त्यामुळे त्यांना 50 षटकांत 6 बाद 251 धावाच करता आल्या. जगदीश झोपेने 45 धावा देत दोन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अझीम काझीने 10 षटकांत फक्त 30 धावा देत एक फलंदाज बाद केला.
संक्षिप्त धावफलक
उत्तराखंड : 50 षटकांत 6 बाद 251 धावा – तनुश गुसेन 55 – 88 चेंडू (8 चौकार), स्वप्नील सिंग 66 – 66 चेंडू (पाच चौकार, एक षटकार), मुकेश चौधरी 2/68, जगदीश झोपे 2/45 पराभूत वि. महाराष्ट्र 49.5 षटकांत 6 बाद 252 धावा – अंकित बावणे नाबाद 113 धावा – 132 चेंडू (12 चौकार, एक षटकार), स्वप्नील सिंग 2/20, हिमांशू बिश्त 2/42.

Exit mobile version