महाराष्ट्राच्या दीपालीचे विक्रमासह सुवर्णपदक

| पणजी | वृत्तसंस्था ।

महाराष्ट्राच्या दीपाली गुरसाले हिने 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राला विक्रमी कामगिरीसह सुवर्णपदक जिंकून दिले. तिने महिलांच्या 45 किलो वजन गटात अव्वल कामगिरी नोंदवताना एकूण 165 किलो वजन उचलले.

वेटलिफ्टिंग स्पर्धेला बुधवारपासून कांपाल येथील क्रीडानगरीत सुरुवात झाली. पश्चिम बंगालच्या चंद्रिका तडफदार हिने 162 किलो वजन उंचावून रौप्य, तर तेलंगणाच्या टी. प्रियदर्शिनी हिने 161 किलोसह कांस्यपदक पटकावले. दीपाली हिने स्नॅचमध्ये 75 किलो वजन उचलून नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. रौप्यपदक विजेत्या चंद्रिकानेही राष्ट्रीय विक्रम नोंदविताना क्लीन अँड जर्कमध्ये 95 किलो वजन उचलले.

सेना दलाच्या प्रशांतचाही विक्रम
पुरुषांच्या 55 किलो वजन गटात सेनादलाच्या प्रशांत कोली याने राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक प्राप्त केले. त्याने एकूण 253 किलो वजन उचलले. त्यापैकी स्नॅचमध्ये 115 किलो वजन उचलून त्याने विक्रमाला गवसणी घातली. महाराष्ट्राच्या मुकुंद अहेर याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने 249 किलो वजन उचलले. आंध्र प्रदेशचा एस. गुरू नायडू (230 किलो) कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

छत्तीसगडच्या ज्ञानेश्वरीला सुवर्ण
महिलांच्या 49 किलो वजन गटात छत्तीसगडच्या ज्ञानेश्वरी यादव हिने सुवर्णपदक जिंकताना एकूण 177 किलो वजन उचलले. हरियानाच्या प्रीती हिने 174 किलोंसह रौप्य; तर ओडिशाच्या झिल्ली दालाबेहेरा हिने 167 किलोंसह कांस्यपदक प्राप्त केले.

Exit mobile version