। उत्तरांचल । प्रतिनिधी ।
महाराष्ट्राच्या मुलींच्या पाठोपाठ मुलांनी देखील राजस्थान पुढे नांगी टाकत पराभव पत्करला. उत्तराखंड येथील सुद्रापूर येथे सुरू असलेल्या 31व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांना राजस्थानकडून 42-29 अशा सरळ 13 गुणांनी पराभवास सामोरे जावे लागले.
मध्यांतरापर्यंत महाराष्ट्राने कडवी लढत दिली. मध्यांतराला महाराष्ट्र 15-16 अशा एका गुणाने पिछाडीवर होता. मध्यांतरानंतर मात्र महाराष्ट्राच्या खेळाडूंचे सामन्यावरील नियंत्रण सुटले. त्यातच तीन वेळा झालेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या अव्वल पकडी महाराष्ट्राला पराभवाच्या गर्तेत घेऊन गेल्या. आकाश भांडे, सिद्धार्थ मुरमुरे, नौशाद शेख यांचा राजस्थान पुढे काही प्रभाव पडला नाही. या पराभवाने मुलांचे आव्हान देखील उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.
मुलांच्या दुसर्या सामन्यात छत्तीसगडने तेलंगणाला 41-14 असे नमवित उपांत्य फेरीत धडक दिली. तर हरियाणाने बिहारला 55-17 आणि उत्तराखंडने दिल्लीला 49-34 असे नमवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. राजस्थान विरुद्ध छत्तीसगड आणि हरियाणा विरुद्ध उत्तराखंड अशा मुलांत उपांत्य लढती होतील. मुलींच्या विभागात हरियाणाने साईला 32-31; उत्तर प्रदेशने बिहारला 36-20; दिल्लीने हिमाचल प्रदेशाला 46-32 तर तामिळनाडूने पंजाबला 31-28 असे पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली. मुलींमध्ये हरियाणा विरुद्ध उत्तर प्रदेश आणि दिल्ली विरुद्ध तामीळनाडू अशा उपांत्य लढती होतील.