शैक्षणिक कामगिरीत काठावर पास
| रायगड | सुयोग आंग्रे |
शैक्षणिक वर्ष 2020- 2021 मध्ये देशाच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आलेखात महाराष्ट्र अग्रस्थानी होता. स्पर्धात्मक युगात शैक्षणिक क्षेत्रातदेखील होणारे बदल पाहता शैक्षणिक वर्ष 2024- 2025 मध्ये महाराष्ट्राची शैक्षणिक कामगिरी श्रेणी निर्देशांक घसरला आहे. एकीकडे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविले जाणारे धोरणात्मक बदल राबविण्याकडे शिक्षण विभागाचा कल असलातरी दुसरीकडे गुणवत्तेमध्येच घसरण झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. देशात नावलौकिक असलेले महाराष्ट्राचे शालेय शिक्षण क्षेत्र कोरोनानंतर पिछाडीवर आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्राची घसरण कायम असल्याचे दिसून आले. एकूण दहापैकी सातव्या श्रेणीवर महाराष्ट्र फेकले गेले आहे. रायगड जिल्ह्याची अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता, अध्ययन व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा गटात पिछेहाट झाली आहे.
देशातील एकंदर सर्वच राज्यातील शालेय शिक्षणाची अवस्था स्पष्ट करणारा अहवाल दरवर्षी केंद्र शासनाकडून जाहीर केला जातो. त्यानुसार, राज्यांचा परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (पीजीआय) म्हणजे शैक्षणिक कामगिरी श्रेणी निर्देशांक कळतो. 2024 सालातील कामगिरीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे.एकंदर एक हजार गुणांपैकी एखादे राज्य किती गुण मिळविते, त्यावर हा निर्देशांक ठरतो. या अहवालात महाराष्ट्राने केवळ 582 गुण मिळवून सातवी श्रेणी (प्रजेष्ट 3 श्रेणी) मिळविली आहे. त्यामुळे 35 टक्केच्या आसपास गुण मिळवून राज्य एका अर्थाने काठावरपास झाले आहे. मात्र देशात सर्वाधिक गुण मिळविणारे चंदीगढ राज्यही 703 गुणांपर्यंतच पोहोचू शकले. त्यावरुन हा कामगिरी निर्देशांक किती कठोर निकषांवर ठरविला गेला, हे स्पष्ट होते.
पीजीआयमध्ये देशातील 748 जिल्ह्यांचा समावेश होता. त्यानुसार एकूण 73 निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. हे निकष निष्पत्ती आणि प्रशासकीय व्यवस्थापनाशी निगडीत आहेत. सहा गटात 12 मुद्यांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता, शाळा व शिक्षकांची उपलब्धता, वर्गातील प्रभावी अध्ययन, उपक्रम, पायाभूत सुविधा, शाळा व विद्यार्थ्यांची सुरक्षितता, डिजिटल अध्ययन आणि प्रशासकीय प्रक्रिया, निधीचा वापर, हजेरी नियंत्रण यंत्रणा आणि शाळा नेतृत्व विकास आदी मुद्द्यांचा समावेश होता. या मूल्यमापनात गुणांनुसार श्रेणी निश्चित करण्यात आली.
राज्यांसोबतच सर्व जिल्ह्यांचाही शैक्षणिक कामगिरीचा निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रात 600 पैकी 345 गुण घेऊन कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला आहे. तर परभणी जिल्हा केवळ 276 गुणांसह महाराष्ट्राच्या तळाशी अडकला आहे. विद्येचे माहेरघर असणारा पुणे जिल्हा कामगिरी निर्देशकांच्या यादीत नवव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. देशाची आर्थिक राजधानीचे शहर असणाऱ्या मुंबईचा क्रमांक तर रायगड जिल्ह्याच्या शैक्षणिक कामगिरीचा श्रेणी निर्देशांक 14 व्या स्थानावर घसरला आहे.