महाराष्ट्राची शान धुळीस मिळवली- चित्रलेखा पाटील

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

आताच्या महायुती सरकारने दिल्लीसमोर झुकून महाराष्ट्र राज्याची शान धुळीस मिळवली आहे. गुंडगिरी, दहशत व महागाईला मतदार कंटाळले आहेत. अलिबाग, मुरूड व रोहा विधानसभा मतदार संघात विरोधकांनी फलक लावून विकास फक्त बोर्डावर केला आहे. प्रत्यक्षात मात्र कामच दिसत नाही. त्यामुळे जनता संतप्त झाली आहे. खोटे गुन्हे दाखल करणे, न लागणार्‍या नोकर्‍यांमुळे कार्यकर्ता त्रस्त झाला आहे. शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी ही लाल बावट्याच्या सच्च्या शिलेदाराची आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमान व अभिमानासाठी निष्ठेचा झेंडा फडकविण्याची आता वेळ आली आहे, असे प्रतिपादन शेकापच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी केले.

अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथील रविवारी (दि.27) संपन्न झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या प्रचारादरम्यान त्या बोलत होत्या. पुढे चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई म्हणाल्या की, पन्नास खोक्यांचा शिंदे गट दिल्लीमध्ये जाऊन मोदी-शहांसमोर झुकून त्यांनी महाराष्ट्राची आण, बाण, शान पूर्णपणे धुळीस मिळवल्याचे सांगत त्यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला. स्थानिक आमदार शिंदे गटाचे असून ते अलिबाग-मुरूड व रोहा विधानसभा मतदारसंघातील बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी अपयशी ठरलेले आहेत. शेकापने आणलेल्या चारशे नोकर्‍यांवरदेखील विद्यमान आमदारांनी स्थगिती आणली. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील ही स्थगिती नक्कीच उठवतील आणि बेरोजगारांना हक्काची नोकरी मिळवून देतील.


विद्यमान आमदारांनी जे पन्नास खोके आणले, ते गळक्या सिव्हील हॉस्पिटलचे, रखडलेल्या पेन्शनचे, सरकारी नोकरांच्या अडकलेल्या पगाराचे आहेत. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील हे स्वतंत्र विचार आणि झेंडा घेऊन तळागाळातल्या लोकांसाठी काम करत आहेत. शेतकरी कामगार पक्षाची एक कार्यकर्ती म्हणून प्रचंड अभिमान वाटतो. युवा व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचादेखील खूप हेवा वाटतो. शेकापक्षाची आणि झेंड्याची आण, बाण आणि शान राखण्याचे कर्तव्य याच कार्यकर्त्यांच्या हातात आहे. विरोधकांनी शेतकरी कामगार पक्षाचा खोटा प्रचार करून मते मिळवली. त्यावेळी जी चूक झाली, ती आता पुन्हा होणार नाही. पुन्हा एकदा नव्या उमेदीने कार्यकर्त्यांनी कामाला लागून ही निवडणूक लढविण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी केले.

बदला घेण्याची हीच वेळ!
या मतदारसंघातील अनेक प्रश्‍न यापूर्वी स्व. मीनाक्षी पाटील, जयंत पाटील, पंडित पाटील यांनी सोडविले आहेत. पोटतिडकीने अधिवेशनात त्यांची बाजू मांडून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे. आताच्या आमदारांनी विकासाच्या फक्त बाता मारण्याचेच काम केले आहे. जयंत पाटील यांचा पराभव होताच गुवाहटीवरून पन्नास खोके आणणारे आमदार चिखलात लोळतात. जय-पराजय हे होत असतात. परंतु, आमदार किती खालच्या खालच्या थराला जाऊ शकतो, हे या मतदारसंघातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे आता या सर्वाचा बदला घेण्याची वेळ आली आहे, असे आवाहन चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी मतदारांना केले.
Exit mobile version