10 गडी राखून उडवला धुव्वा
। संभाजीनगर । प्रतिनिधी ।
महाराष्ट्राने मेघालयचा 10 गडी राखून धुव्वा उडवला आणि बोनस गुणासह सात गुणांची कमाई केली आहे. रणजी करंडकातील पदार्पणाच्या सामन्यात 128 धावांची खेळी साकारणारा हर्षल काटे याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली आहे. आता ‘अ’ गटातून महाराष्ट्राने तीन सामन्यांनंतर आठ गुणांची कमाई केली आहे. मेघालयचा संघ तीनही सामन्यांत पराभूत झाल्यामुळे त्यांना अद्याप गुणांचे खातेही उघडता आलेले नाही.
मेघालय संघाने आठ बाद 157 या धावसंख्येवरून मंगळवारी (दि.29) पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी सुमीतकुमारने 45 धावांची खेळी केली. तसेच, बालचंदर अनिरुद्ध (36), सुमीतकुमार (45), आकाश चौधरी (26) यांच्या खेळीमुळे मेघालय संघाला दुसर्या डावात 185 धावा करता आल्या. महाराष्ट्राकडून मुकेश चौधरीने 61 धावा देत चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. प्रदीप दाढे व रजनीश गुरबानी यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. हितेश वाळुंजने एक फलंदाज बाद केला. महाराष्ट्रासमोर विजयासाठी 101 धावांचे आव्हान उभे राहिले.
सलामी फलंदाजांची शतकी भागीदारी महाराष्ट्राने विजयी लक्ष्य अगदी सहज ओलांडले. सिद्धेश वीर व मुर्तझा ट्रंकवाला या सलामी जोडीने 104 धावांची नाबाद भागीदारी करताना मेघालयच्या गोलंदाजांचे आव्हान समर्थपणे थोपवून लावले. मुर्तझा ट्रंकवाला याने नाबाद 78 धावांची खेळी साकारली. त्याने आपली खेळी 13 चौकारांसह सजवली. सिद्धेश वीर याने नाबाद 24 धावा करीत त्याला उत्तम साथ दिली.