मैसूरच्या समुद्रावर महाराष्ट्राची ‌‘जलक्रीडा’

युथ चॅम्पियनशिपमध्ये ‌‘सुवर्ण’ पाऊस

| उरण | वार्ताहर |

यॅचिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने युथ अँड ज्युनियर मल्टिक्लास चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मैसूर येथील कृष्णराज सागर जलाशयाच्या लाटांवर महाराष्ट्राच्या जलक्रीडा संघाने आपल्या कौशल्य, चिकाटी आणि शिस्तीच्या बळावर सुवर्ण यश मिळवले. या स्पर्धेत देशभरातून 300 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.

रॉयल मैसूर सेलिंग क्लब यांच्या सहकार्यातून 20 ते 25 जून या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या सेलिंग, सर्फीग या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे नेतृत्व नाव्या काकू हिने उत्तमरीत्या केले. तिने 15 वर्षांखालील मुलींच्या गटातील आयक्यू फॉईल या नवोन्मेषी आणि वेगवान जलक्रीडा प्रकारात जबरदस्त नियंत्रण आणि वेग दाखवत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. हे तिच्या मेहनतीचे आणि तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाचे उत्तम उदाहरण ठरले. मुलांच्या गटात, मोहित म्हात्रे याने टेक्नो 293डी प्रकारात दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. त्याच्या खेळातील आत्मविश्वास आणि समतोल यामुळे त्याने राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख अधिक भक्कम केली.

तसेच, 19 वर्षांखालील मुलींच्या गटात रुद्राक्षी मनोहर टेमकर हिने रेसबोर्ड स्पर्धेत जोरदार स्पर्धा करत सुवर्णपदक जिंकले. तर, साई पाटील याने मुलांच्या गटातील रेसबोर्ड प्रकारात रौप्यपदक पटकावले. 15 वर्षांखालील मुलींच्या टेक्नो 293डी प्रकारातील चुरशीच्या स्पर्धेत प्रियांशी पाटील हिने आपली लढवय्यी वृत्ती दाखवत रौप्यपदक मिळवले. तसेच, ऑप्टीमीस्ट प्रकारात वृत्तिका म्हात्रे हिने कांस्यपदकासह सर्वात तरुण महिला स्पर्धक म्हणून विशेष गौरव प्राप्त केला. या उल्लेखनीय यशाचे श्रेय महाराष्ट्र याचिकेच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमांना, कौशल्याभिमुख पद्धतीला आणि युवा विकासावर दिलेल्या भराला जाते.
खेळाडूंनी केवळ पदके जिंकून दिली नाहीत, तर त्यांनी जलक्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यामुळे राज्याच्या क्रीडाविश्वात हा क्षण ऐतिहासिक ठरत आहे.

Exit mobile version