महातिवरणची ग्राहकांवर दंडेलशाही

चालू महिन्याचे बिल न भरल्याने कनेक्शन कट
ग्राहकांमधून संताप व्यक्त
श्रीवर्धन | वार्ताहर |
ज्या तारखेला वीज बिल भरणा करण्याचा शेवटचा दिवस असतो, त्याच्या एक दिवस अगोदर वीज बिल ग्राहकांना मिळते. हाती पगार नसल्याने अनेक ग्राहक सरचार्ज भरुन बिल भरतात. महावितरणकडूनच बिल वितरणास विलंब होत असूनही शॉक मात्र ग्राहकांना देण्यात येत आहे. बिल थकीत बिल असेल, तर वीज कनेक्शन कापले तर समजू शकतो, परंतु, चालू महिन्याचे बिल भरले नाही म्हणून कनेक्शन कापणे योग्य नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्राहकांकडून महावितरणविरोधात उमटत आहेत.
महावितरणने वीज ग्राहकांकडून लवकरात लवकर वसुली करण्यासाठी चालू महिन्याची बिले न भरलेल्याची वीज कनेक्शन कापण्याचे उद्योग सुरू केले आहेत. ज्या वीज ग्राहकांची बिले पाचशे ते हजार रुपयाच्या सरासरीमध्ये असतात, अशा ग्राहकांचीदेखील वीज जोडणी महावितरणने चालू बिल न भरल्यामुळे कापली आहे. जे ग्राहक वीज देयक भरण्याच्या तारखेनंतर बिले भरतात, त्यांच्याकडून महावितरण दहा रुपयांपासून पन्नास रुपयांपर्यंत सरचार्ज वसूल करत असते. परंतु, असे असतानादेखील महावितरणने चालू महिन्याची बिले न भरल्याने वीज जोडणी कापण्याचा उद्योग सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.

आठ दिवस आधी बिल द्या
ज्या दिवशी अंतिम वीज वीज देयक भरण्याची तारीख असते, त्याच्या कमीत कमी आठ दिवस अगोदर ग्राहकांना वीज बिले देण्यात यावी, अशी मागणी ग्राहकांमधून करण्यात येत आहे. ज्या ग्राहकांची एक महिन्याच्या वरती बिले थकीत असतील, त्यांचे वीज कनेक्शन कापले तर ठीक आहे. परंतु, चालू महिन्याचे वीज बिल भरले नाही म्हणून लगेच त्याचे वीज कनेक्शन कापणे योग्य नाही. महावितरणच्या या दंडेलशाही कारभाराविरोधात ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वरिष्ठ कार्यालयाकडून वीज बिल वसुलीसाठी अत्यंत सक्त पावले उचलण्यात येत आहेत. त्यामुळे आम्हाला ऑगस्ट महिन्याची वीज बिले ज्यांनी भरली नाहीत, त्यांचे वीज कनेक्शन कापण्याशिवाय पर्यायच नाही. ग्राहकांनी वीज बिले वेळेवर भरावी, म्हणजे वीज कनेक्शन कापण्याची वेळ येणार नाही.
महेंद्र वाकपैंजण, सहा. कार्यकारी अभियंता, महावितरण, श्रीवर्धन

Exit mobile version