पाच लाखांपर्यंत मोफत उपचार
। ठाणे । प्रतिनिधी ।
जागतिक आरोग्य दिनी गोरगरीब आणि कामगार कुटुंबांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. आता महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना राज्यातील कामगार विमा योजना रुग्णालयांमध्येही उपचाराची सुविधा मिळणार आहे. म्हणजेच, खासगी रुग्णालयांपुरती मर्यादित असलेली ही योजना आता सरकारी कामगार रुग्णालयातही खुली झाली आहे आणि विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विलास डोंगरे यांनी दिली.
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी राज्यातील कामगार विमा योजना रुग्णालयांमध्ये ‘महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना’चा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या योजनेमुळे आता राज्यातील कामगार रुग्णालयांमध्ये येणार्या पात्र लाभार्थ्यांना वैद्यकीय उपचाराचा थेट लाभ घेता येणार आहे. राज्य कामगार विमा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास डोंगरे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे कामगार आणि गरीब कुटुंबियांना आता सरकारी रुग्णालयांमध्येही महात्मा फुले योजनेचा लाभ मिळणार आहे, ज्यामुळे सर्व सामान्य नागरिकांवरील उपचारांसाठीचा आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
कामगार कुटुंबांना दिलासा
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे आरोग्य सुविधा आता अधिक सुलभ आणि सामर्थ्यवान होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार असून, सरकारी रुग्णालयांवरील विश्वास आणि सेवा अधिक बळकट होणार आहेत. आता महात्मा फुले योजनेचा लाभ सरकारी कामगार रुग्णालयांतही उपलब्ध झाल्यामुळे हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.