मविआचे पारडे जड; भाजपवर नाराजी
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून पालिकेतील प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये शेकापसह महाविकास आघाडीतील उमेदवारांची प्रचारात आघाडी घेतली आहे. पालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते. तर, त्यानंतर झालेल्या खासदारकी आणि आमदारकीच्या निवडणुकीत देखील या तीनही प्रभागातील जास्तीत जास्त मतदारांनी आघाडीच्या उमेदवारांच्या पारड्यात आपली मतं टाकली असल्याने या वेळच्या पालिका निवडणुकीत आपल्या उमेदवारांना चांगले यश मिळेल, अशी आशा महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे. तसेच, या प्रभागात भाजपच्या कार्यावर सर्वसामान्यांची नाराजी आहे. त्याचा फायदा देखील मविआला होणार असल्याची चर्चा आहे.
पनवेल पालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये ग्रामीण भागाचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. या भागातील मतदारांनी विधानसभेत आमदार प्रशांत ठाकूर यांना नाकारल्याचे गणित मतदानाच्या आकेडवारीपासून स्पष्ट झाले होते. त्यामुळे शहरी भागातून जागा वाटपाबाबत महाआघाडीत चर्चा ताणल्या गेल्या नाहीत. परंतु, प्रभाग क्रमांक 1, 2, आणि 3 मधील उमेदवारांच्या निवडीबाबत ताणल्याचे पहायला मिळाले. भाजपकडे मात्र युती असूनही या भागात उमेदवारांची वाणवा असल्याचे चित्र होते. त्यामुळे या भागातील लढाई महाआघाडीसाठी सोपी असल्याचे बोलले जात आहे. तसेच, या क्षेत्रात सर्वाधिक ग्रामीण भाग असून येथे शेतकरी कामगार पक्षाचे चांगले वर्चस्व आहे. त्यामुळेच महापालिकेच्या पहिल्या निवडणूकीत या भागातून शेकापचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते. या प्रभागात तळोजा मजकूर, घोट, कोयनावेळे, पेंधर, नागझरी, घोट, पेंधर, नागझरी, चाळ, तोंडरे, देवीचापाडा, ढोंगऱ्याचा पाडा, पालेबुद्रुक, पडघे, नावडे, पेठाली, तळोजा, खुटारी, पापडीचा पाडा, पेठ, रांजणपाडा, ओवे, ओवेकँम्प, धोमोळे, तळोजा, धानसर, किरवली, धरणे, धरणाकँम्प, रोहींजण, पिसार्वे, तुर्भे, करवले ही गावे येतात. याशिवाय तळोजात नव्याने वसलेली सिडको वसाहतीमुळे अल्पउत्पन्न गटातील अनेक कुटूंब नव्याने स्थलांतरीत झालेली आहेत. ग्रामीण भागातील स्थानिक नागरिक आणि तळोजा सारखे मुस्लिमबहुल गावांत इथल्या मतदारांनी भाजपाला नाकारलेले आहे.
मविआला भाजपवरील नाराजीचा फायदा
शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील आणि शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांना मिळालेली मते एकत्र होऊन महाविकास आघाडीचा विजय होईल, अशी स्थिती आहे. भाजपने देखील जनसंपर्कांपेक्षा आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार देऊन महाआघाडीची स्पर्धा सुरू केली आहे. मात्र, गावे स्मार्ट करण्याचा भाजपा सत्ताधाऱ्यांचा दाव्याला अपयश आले आहे. गावातील रस्ते कॉक्रीटीकरण व गटारे इत्यादी कामे रखडल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे या भागात महाविकास आघाडीला भाजपवरील नाराजीचा फायदा अधिक होऊ शकतो. तसेच, शहरीभागात प्राबल्य असलेल्या भाजपला ग्रामीण भागातील प्रभाग 1 मध्ये चांगला उमेदवार शोधणे देखील कठीण झाले होते.
मतदारांचा भरगोस प्रतिसाद
महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार हरेश केणी, तुषार पाटील, प्रगती पाटील आणि लीला कातकरी हे सर्व हाताचा पंजा निशाणी घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांनी आपल्या प्रचारामध्ये आघाडी घेतली असून त्यांना मतदारांचा भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे. यावेळी महानगरपालिकेसाठी शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी, शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि इतर घटक पक्षाचे कार्यकर्ते ही आपलीच निवडणूक आहे असे समजून जोमाने काम करत आहेत.







